ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे यंदाचे निकाल अनेक प्रकारे आश्चर्यचकीत करणारे ठरले आहेत. दिग्गज नेत्यांच्या पराभवापासून ते मोठ्या प्रमाणात 'नोटा' पर्यायाचा वापर हे यंदाच्या निवडणुकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी ईव्हीएममधील 'नोटा' पर्यायाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. महानगरपालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 227 प्रभागांमध्ये जवळपास 72,897 मुंबईकरांनी उमेदवारांना मतदान करण्याऐवजी 'नोटा' पर्यायाला अधिक पसंती दिली आहे.
अनेक प्रभागांमध्ये नेत्यांना निवडण्याऐवजी मतदार राजाने नोटाचा पर्याय स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. नोटाच्या वाढत्या वापराला लोकशाहीतील एक नवी सुरुवात आहे, असे राजकीय विश्लेषक मानत आहेत. नोटा वापरणं म्हणजे मतदारांचा उमेदवारांविरोधात असलेला हा रोष आहे. शिवाय, मतदारांना चांगले उमेदवार हवे आहेत, असा थेट संकेत याद्वारे मिळत आहे, असे मत विश्लेषकांचे मांडले आहे.
मनपा निवडणुकांमध्ये मुंबईकरांकडून 'नोटा' पर्याय वापरासंदर्भात 'फ्री अ बिलियन'चे नोटा अॅक्टिव्हिस्ट जेमिन वैष्णो यांनी सांगितले की, 'उमेदवारांवर बहिष्कार टाकण्याची ही सुरुवात आहे. मतदार जेव्हा उमेदवारांचे कार्य आणि त्यांच्या प्रतिमेपासून समाधानी नसतात, तेव्हा ते नोटाचा वापर करतात. राजकीय पक्षांसाठी हा एक इशारा आहे. सर्व राजकीय पक्षांना मतदारांचा रोष समजून घेण्याची गरज आहे. वेळेत याकडे लक्ष दिले गेले नाही तर याचा वाईट परिणाम होईल', अशी शक्यताही त्यांनी आहे.
ईव्हीएम मशिनमध्ये नोटाचा पर्याय उपलब्ध झाल्याने अधिक प्रमाणात नागरिकांकडून नोटाचा वापर करण्यात आला आहे. ज्या प्रभागांकडे 'नोटा' या पर्यायाचा वापर करण्यात आला आहे, तेथे निश्चित स्वरुपात उमेदवारांविरोधात मतदारांनी असंतोष व्यक्त केला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये 9 हजार जणांनी नोटाचा वापर केला होता. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल 70 हजारहून अधिक जणांनी नोटा पर्यायाचा वापर केला आहे. ही बाब लोकशाहीसाठी सकारात्मकआहे मात्र राजकारण आणि नेतेमंडळीसाठी हा संकेत चांगला नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.