मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात नवीन पुरावे सापडल्याचा दावा राज्य सरकारनेउच्च न्यायालयात गुरुवारी केला. आरोपीविरोधात नवीन पुरावे सापडले असून, पुढील कायदेशीर कारवाई ठरविण्यासाठी विधी व न्याय विभागाकडून सूचना घेणे आवश्यक आहे, असे सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाला सांगितले.नवीन पुरावे हाती लागल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात जायचे की पुन्हा सत्र न्यायालयात जायचे, याबाबत सूचना घेण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत द्या, अशी विनंती शिंदे यांनी खंडपीठाला केली. आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सरकारच्या विनंतीवर आक्षेप घेतला. ही याचिका नाहक प्रलंबित ठेवली आहे. सरकारची याचिका फेटाळण्यास योग्य आहे. कोणतेही नवीन पुरावे सापडलेले नाहीत. त्यांना जर नवीन पुरावे सापडले असतील तर त्यांनी ही याचिका मागे घ्यावी, असा युक्तिवाद इचलकरंजीकर यांनी केला.न्यायालयाने सरकारी वकिलांना तीन आठवड्यांची मुदत देत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे पानसरे यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. २० फेब्रुवारी रोजी त्यांचा मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्याच महिन्यात कोल्हापूर न्यायालयाने तावडेसह दहाजणांवर आरोप निश्चित केले. सत्र न्यायालयाने तावडे याची जामिनावर सुटका केली. मात्र, या सुटकेचा राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी वीरेंद्रसिंह तावडेविरोधात आणखी पुरावे, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:50 AM