पंढरपूर : आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी पाच लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे रांझणी रोडवरील स्वेरी महाविद्यालयाच्याही पुढे गेली असून, दर्शनासाठी तब्बल १८ तासांहून अधिक वेळ लागत असल्याचे बुलडाणा येथील संतोष सालसट या वारकºयांनी सांगितले.
वारकरी संप्रदायातील कुंभमेळा म्हणून ज्या आषाढी यात्रेकडे पाहिले जाते त्या यात्रेतील प्रमुख दिवस एकादशीचा उत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून पालखी सोहळे, दिंड्यांमधून तसेच शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून रेल्वे, एसटी तसेच खासगी वाहनांमधून पाच लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
दरम्यान, बुधवारी बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे उभे आणि गोल रिंगण तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण पार पडले़ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालख्यांसह अन्य पालख्या वाखरी येथे मुक्कामी विसावल्या़ इकडे भाविकांच्या अलोट गर्दीमुळे पंढरीतील रस्ते, चौक फुलून गेले आहेत. शहरातील सर्व रस्त्यांवर भाविकांचा महापूर ओसंडून वाहू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ प्रत्येक भाविक ‘माऊली माऊली’ म्हणत या गर्दीतून वाट काढत पुढे-पुढे जात आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनरांग संत गोपाळपूरपासून पुढे स्वेरी कॉलेजच्याही पुढे गेली आहे़ मंदिर समितीने स्वेरी कॉलेजपर्यंतच दर्शनरांगेची सोय केली होती़ मात्र, त्याच्याही पुढे भाविकांची रांग गेली आहे़ दर्शन रांगेची सोय नसतानाही भाविक रांगेत शिस्तीत सहभागी होताना दिसून आले़ त्यामुळे पदस्पर्श दर्शनासाठी तब्बल १८ तासांहून जास्त कालावधी लागतोय, असे श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन पश्चिमद्वारातून बाहेर आलेले प्रकाश गाबणे (हिंगोली) या भाविकाने सांगितले.
प्रकाश गाबणेसह त्यांचे ८ ते १० सहकारी बुधवारी पहाटे २ वाजता पदस्पर्श दर्शन रांगेत उभे राहिले़ रात्री १० वाजता म्हणजेच १८ तासानंतर ते दर्शन घेऊन बाहेर आले़ पांडुरंगाच्या दर्शनाने मी धन्य झालो असून, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याचे ते आनंदाने सांगत होते़