राजापूर (जि. रत्नागिरी) : सरकारने विनाशकारी प्रकल्प कोकणच्या माथी मारताना जी दंडेली चालविली आहे तेवढी इंग्रजांच्या काळातही झाली नव्हती. सरकार जनतेच्या घरावर नांगर फिरवून विकास करणार असेल तर त्याला काँग्रेसचा विरोध असून हा प्रकल्प आम्ही हाणून पाडू, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चव्हाण यांची सागवे येथील कोचाळी मैदानावर सभा झाली. व्यासपीठावर काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई सावंत, हुस्नबानु खलिफे, प्रदेश प्रवक्ते हरिष रोग्ये, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम आदी उपस्थित होते.या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावरुन शिवसेना - भाजपामध्ये निर्माण झालेल्या संघर्षावर चव्हाण यांनी जोरदार तोफ डागली. आपणही या राज्याचे मुख्यमंत्री होतो. उद्योगमंत्री म्हणूनही काम पाहिले असल्याने सर्व कायदे चांगलेच माहीत आहेत. रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी उद्योग खात्याने काढलेली अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार जसे मुख्यमंत्र्याना आहेत, तसेच ते उद्योगमंत्र्यांनाही आहेत. मात्र, ते अधिकार सचिव पातळीवर नाहीत, याची त्यांनी आठवण करुन दिली. उद्योगमंत्र्यांना तसे अधिकार नाहीत, हे मुख्यमंत्र्यांचे विधान लक्षात घेता हे राज्य मुख्यमंत्र्यांचे आहे का सचिवांचे आहे, असा प्रश्नही चव्हाण यांनी केला.
सरकारकडून इंग्रजांपेक्षाही भयंकर दडपशाही-चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:29 AM