संकटं जितकी गंभीर, तितका महाराष्ट्र खंबीर; महाविकास आघाडी भक्कम, अजित पवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 10:23 PM2021-11-27T22:23:18+5:302021-11-27T22:25:56+5:30

महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसू दिली नाही. प्रत्येक संकटाचा यशस्वी मुकाबला करण्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारनंही कायम ठेवली असं अजित पवार म्हणाले.

The more severe the crisis, the stronger Maharashtra; Mahavikas Aghadi strong Says Ajit Pawar | संकटं जितकी गंभीर, तितका महाराष्ट्र खंबीर; महाविकास आघाडी भक्कम, अजित पवारांचा विश्वास

संकटं जितकी गंभीर, तितका महाराष्ट्र खंबीर; महाविकास आघाडी भक्कम, अजित पवारांचा विश्वास

Next

मुंबई - “महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेच्या आशा, आकांशा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न केला. कृषी, उद्योग, वीज, व्यापार, शिक्षण, सहकार, साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम रहावं. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी सर्वांना सोबत घेऊन यापुढेही निष्ठेनं काम करीत राहील. दोन वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या सर्वांचं मी मन:पूर्वक आभार मानतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावना व्यक्त केली आहे.

अजित पवार म्हणाले की, नागरिकांमध्ये एकता, समता, बंधुतेची भावना वाढावी. सर्व समाजघटकांना विकासाची समान संधी उपलब्ध व्हावी. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. राज्यातील सत्तास्थापनेला आज दोन वर्षे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आलं. या दोन वर्षांच्या काळात राज्यावर कोरोना, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळासारखी अनेक नैसर्गिक संकटं आली. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली. त्याचा उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. संकटं किती मोठी असली तरी महाराष्ट्र कधी खचला नाही. कुणापुढे झुकला नाही. संकटं जितकी गंभीर.. तितका महाराष्ट्र खंबीर हा इतिहास आहे महाविकास आघाडी सरकारनं ती परंपरा कायम राखली असं त्यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसू दिली नाही. प्रत्येक संकटाचा यशस्वी मुकाबला करण्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारनंही कायम ठेवली. राज्यातील प्रत्येकाला सोबत, विश्वासात घेऊन सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं, एकजुटीनं राज्यावरच्या संकटावर मात केली. प्रत्येक महाराष्ट्रवासियाला याचा अभिमान आहे. राज्यावरचं कोरोना संकट अभूतपूर्व होतं. संकटकाळात राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, फार्मासिस्ट, सफाई कामगार, पोलिस, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनं जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरोधी लढ्यात अमूल्य योगदान दिलं आहे. या कोरोनायोद्ध्यांचं उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले असून कोरोनायोद्ध्यांचा त्याग महाराष्ट्र कायम लक्षात ठेवील, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, कोरोना संकटांच्या बरोबरीनं राज्यासमोर आर्थिक आव्हानंही उभं राहिली. या आव्हानांचा सामना करताना राज्याची आर्थिक घडी  विस्कटणार नाही, राज्यातली विकासकामे थांबणार नाहीत. विकासाची प्रक्रिया अखंड, निरंतर सुरु राहील याची संपूर्ण काळजी घेण्यात आली. रस्ते, रेल्वे, मेट्रो, कोस्टलरोड, उड्डाणपूलांसारख्या पायाभूत प्रकल्पाची कामे गतीमान करण्यात आली. पायाभूत प्रकल्प निर्मितीबरोबरंच नागरिकांचं रोजचं जगणं सुसह्य होईल यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. धोरणं आखून अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी  बांधिल असल्याचा पुनरुच्चार केला.

Web Title: The more severe the crisis, the stronger Maharashtra; Mahavikas Aghadi strong Says Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.