मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. या बंडात एकनाथ शिंदेंला ४० हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शिंदे आणि समर्थक आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे.
त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या बंडाला स्थानिक पातळीवरूनही समर्थन मिळत असल्याचं समोर येत आहे. आमदारच नाहीत तर शिवसेनेच्या नगरसेवकांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको असा पवित्रा घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत २० तर ठाण्यातील ५० हून अधिक नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार असल्याचं कळतंय. पुढील १-२ दिवसांत हे नगरसेवक आपली भूमिका मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे वृत्त टीव्ही९ ने दिलं.
शिंदे गटाच्या ३४ आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्रविधिमंडळाला शिंदे समर्थक ३४ आमदारांनी पत्र लिहिलं आहे या पत्रात म्हटलंय की, सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप, पोलीस बदल्यांमधील घोटाळा, मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यासारखे मंत्री जेलमध्ये असल्याने आमचे सदस्य आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावं लागत आहे. त्याचसोबत स्थानिक पातळीवर आमची राजकीय प्रतिमा यामुळे मलिन होत आहे. जे सरकारमध्ये आमच्या सोबत आहेत ते पदाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतायेत. शिवसेना पक्षाची विचारधारा ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आहे. परंतु मागील अडीच वर्ष आमच्या पक्षनेतृत्वाकडून सत्तेसाठी विचारधारेशी तडजोड करण्यात येत होती.
आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांना पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार हिंदुत्ववादी विचारधारेशी तडजोड न करता दिले होते. परंतु विचारधारेच्या विरोधात जात पक्षाचे नुकसान होत आहे. २०१९ मध्ये भाजपासोबत युती बनवून त्यानंतर विचारधारेच्या विरोधात जात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बनवली. त्याचा नकरात्मक परिणाम मतदार आणि शिवसैनिकांमध्ये झाला. याबाबत पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला लक्षात ठेवता भ्रष्ट कारभाराच्या सरकारमध्ये शिवसेनेलाही टीका सहन करावी लागत आहे.
मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना आवाहन
ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.