मुंबई : राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बैठक घेतली. पथकाने विदर्भातील चार जिल्ह्यांबाबत नोंदविलेल्या निरीक्षणासंदर्भात नागपूर व अमरावती विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. ‘वर्षा’ येथील समिती कक्षात बैठक झाली. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय पथकातील सदस्य तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. शहरी भागापेक्षा नंदुरबार आणि भंडारा यांसारख्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येचे प्रमाण का वाढत आहे, याचा गांभीर्याने विचार करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात आरोग्य सुविधेत कमतरता नाही; तरीही नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील यंत्रणा अधिक सतर्क करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, पथकाने ज्या भागातील पॉझिटिव्हिटी दर जास्त असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे, त्याची दखल घेऊन तेथील दर कमी करण्यासाठी लक्ष केंद्रित करू. या भागातील रुग्णांची जिनॉमिक सिक्वेन्सची तपासणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील. टास्क फोर्सच्या माध्यमातून डॉक्टरांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात यावे.अमरावती, यवतमाळला पॉझिटिव्हिटी दर जास्तदेशात असलेल्या एकूण सक्रिय कोरोना रुग्णसंख्येपैकी केरळमध्ये ४० टक्के, तर महाराष्ट्रात २४ टक्के रुग्ण आहेत. त्याबाबत आढावा घेण्यासाठी ‘एनसीडीसी’चे संचालक डॉ. सुजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचे पथक शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी मुंबईतील सायन हॉस्पिटल तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर येथे भेटी दिल्या. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी मुंबई, ठाणे, पालघर भागांत जास्त रुग्णसंख्या असून या भागांतील नवीन रुग्णांची संख्या घटत असल्याचे पथकाने सांगितले. विदर्भातील ग्रामीण भागात विशेषत: अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर जास्त आढळून येत असल्याचे निरीक्षण पथकाने नोंदविले आहे.
कोरोनाबाबत विदर्भात अधिक सतर्कतेची गरज; केंद्रीय पथकाचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 2:47 AM