बारामती : मी कोणाला कमी लेखत नाही, पण तुम्ही जर तुलना केल्यास ‘साहेबां’च्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात झाली. पण तसे बोललो, तर म्हणतील बघा साहेबांना कमी लेखतो. त्यामुळे माझी सगळीकडूनच अडचण होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तालुक्यातील पानसरेवाडी येथील प्रचार दाैऱ्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते म्हणाले, घरातील दोन उमेदवार आहेत. तुम्ही लोकसभेला गंमत केली. मी ती मान्य केली. आता गंमत करू नका नाही, तर तुमची जंमत होईल. तालुक्यातील पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका.
काकींना विचारणार...
पवार म्हणाले, १९९१ पासून मला खासदार-आमदार केले, पण प्रतिभाकाकी कधी बाहेर आल्या नाहीत. आता त्या घरोघरी फिरत आहेत. त्यांना एवढा काय नातवाचा पुळका आला आहे माहीत नाही, मी खाताडा-पेताडा, गंजाडी असतो, तर गोष्ट वेगळी होती. मी बारामतीचे वाटोळे केले असते, तर गोष्ट वेगळी होती. निवडणूक झाली की, मी काकींना याविषयी विचारणार आहे.
मोहोळ (सोलापूर) : आम्ही शाहू, फुले, आंबेडकर विचारांची माणसं आहोत. जातीय दरी निर्माण होऊ नये, यासाठी काम करतोय. सगळ्यांना एकाच चष्म्यातून बघू नका, असे अजित पवार यांनी येथे सांगितले.