नाशिक - २०१७ ला मी जेलमध्येच होतो. बाहेर काय झाले माहिती नाही. उद्योगपतीच्या घरी ५ बैठका झाल्या. आम्ही भाजपासोबत राहू शिवसेनेला बाहेर काढा अशी भूमिका पवारांनी घेतली. २०१४, २०१७ यावेळी शिवसेनेला बाहेर काढा असं शरद पवारांनी म्हटलं. २०१९ ला शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली होती. भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता करू हे ठरले. पवारांच्या सांगण्यावरून भाजपाने तेव्हा शिवसेनेला सोडण्याचे ठरवले. २०१९ ला अजित पवारांचा शपथविधी शरद पवारांच्या सांगण्यावरूनच झाला. मला काहीच माहिती नव्हते. अजित पवारांनी हे सांगितले. मग माझ्यावर राग काढायचं कारण काय? प्रफुल पटेल, अजित पवार, जयंत पाटील हेच त्या चर्चेत होते. मी दिल्लीला गेलो नाही. मला दोष देऊन काय उपयोग? असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, भाजपासोबत जावं या ५४ आमदारांच्या सह्यांमध्ये जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचाही समावेश आहे. मला शरद पवारांशी बोलायला सांगितले होते. १५ दिवसांचा वेळ घेतल्यानंतर मी राजीनामा देणार त्यानंतर तुम्ही काय करायचे ते करा असं म्हटलं. पुस्तक प्रकाशानाला राजीनामा द्यायचा हे पवारांच्या घरीच ठरले होते. सगळे ठरले होते. त्यानंतर ३ दिवसांनी शरद पवारांनी माघार घेतली. सुप्रिया सुळेंना १० तारखेला दिल्लीत कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करायचे हे शरद पवारांनी सांगितले. तेव्हा प्रफुल पटेल म्हणाले मी उपाध्यक्ष आहे. मग तिसऱ्या नंबरवर कशाला येऊ. मी राजीनामा देतो. तेव्हा दोघांना कार्याध्यक्ष करायचे ठरवले. शिंदेंच्या सत्तासंघर्षावेळीही जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल पटेल यांना भाजपा नेत्यांकडे बैठकीला पाठवले. त्या बैठकीतही मी नव्हतो. पण या बैठकीला बडोद्याला जायच्या आधी जयंत पाटील निरोप द्यायला गेले तेव्हा जाऊ नका असं म्हटलं असंही भुजबळांनी सांगितले.
त्याचसोबत शरद पवारांनी येवल्याची माफी मागण्याचं काम नाही. भुजबळांनी इथं चांगले काम केले आहे. कांद्याच्या प्रश्नावर मी सातत्याने विधानसभेत लढलो. त्यावेळी दिल्लीत साहेबांना जाता आले असते पण का गेले नाहीत. काल भाषणात जे काही लोक होते ते असतानाही दिंडोरी, नाशिक लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार कसे पडतात? नाशिक जिल्ह्यातील विकासकामांकडे आमचे लक्ष आहे. तुम्ही चिंता करू नका असाही टोला भुजबळांनी लगावला.