मुंबईत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. हल्लेखोर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. याच दरम्यान पोलिसांनी मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे.
"मॉरिस खूपदा म्हणायचा, मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणार" असा खळबळजनक खुलासा मॉरिसच्या पत्नीने केला आहे. "मॉरिस खूपदा म्हणायचा, मी अभिषेकला सोडणार नाही, मी त्याला संपवणारच. पण मी मॉरिसच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही" असं सांगितलं. काही महिन्यांपूर्वी मॉरिसला बलात्कार प्रकरणी अटक झाली होती. तो अनेक महिने तुरुंगात होता.
आपल्या अटकेमागे अभिषेक घोसाळकर यांचा हात आहे अशी त्याची समजून होती. त्याचाच राग मॉरिसच्या मनात धगधगत होता. अभिषेक घोसाळकर यांच्याबद्दल खूप राग होता अशी माहिती आता समोर आली आहे. याच दरम्यान उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. "हे ठाकरे गटातील गँगवॉर, सामनातूनच मॉरिसला मोठं केलं गेलं" असं म्हणत गंभीर आरोप केला आहे.
उदय सामंत यांनी "घोसाळकरांवर गोळीबार झाला आणि मारणाऱ्यानेही आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याचं कोणीही समर्थन करत नाही. अशा घटना घडू नयेत म्हणून नक्कीच शासन पुढाकार घेईल. त्याच्यावर कारवाई करेल" असं म्हटलं आहे. तसेच "फेसबुक लाईव्ह, संभाषण पाहिलं असेल. माजी नगरसेवक आणि मॉरिसने भविष्यात एकत्र काम करण्याची शपथ घेतली. त्यानंतर कायमच सकाळी बोलणाऱ्यांनी एक फोटो ट्विट केला."
"फोटोमध्ये मॉरिस शिंदे साहेबांना नमस्कार करताना दिसत आहे. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काही लोकांनी सुरू केला आहे. सामनातूनच मॉरिसला मोठं केलं गेलं. त्याने आपल्या अनेक बॅनरमध्ये मला उबाठा आणि शिवसेना मोठी करायची असल्याचं म्हटलं आहे. मी जबाबदारीने सांगतोय की कालचं हे गँगवॉर हे उबाठा गटातील आहे. कारण एकमेकांच्या कॉम्पिटीशनमध्ये म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार... यामध्ये हे घडलंय, हे दुर्दैवी आहे" असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.