मोर्शी : तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ जून रोजी निंभी ते आसोना रस्त्यालगत एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत मिळून आला. सदर इसमाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आला होता. मृतदेह एका ट्रकचालकाचा असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. हत्येनंतर त्या ट्रकमधील सोयाबीनदेखील लंपास करण्यात आले. त्या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
प्राथमिक दृष्ट्या सदर इसमाचा अनोळखी इसमांनी खून केल्याचे निदर्शनास आल्यामुळे शिरखेड पोलिसांनी कलम ३०२,२०१ अन्वये गुन्हा नोंदविला. तपासादरम्यान तो अनोळखी मृतदेह नंदकिशोर सकुल उईके (२८, रा. जखवाडी, जि. छिंदवाडा) याचा असल्याचे समोर आले. तो नारायण गणेश घागरे (३१, रा.उमरा नाला जिल्हा, छिंदवाडा, मध्यप्रदेश) याचेकडे ट्रकचालक म्हणून काम करीत होता. अधिक तपासा करीता ट्रक मालक नारायणला ताब्यात घेऊन एलसीबीने विचारपूस केली असता नंदकिशोर हा ४ जून रोजी रोजी छिंदवाडा येथून एशियन पेंन्टचा माल घेऊन अकोला येथे गेल्याची माहिती दिली. त्यावेळी तो एकटाच ट्रकमध्ये होता, असेही सांगितले. परंतु संशय आल्यावरून एलसीबीने अकोला येथील अन्य ट्रकचालकांना विचारपूस केली व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तो एकटा नसून त्याचेसोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले.
नारायण घागरे याला पुन्हा पोलिसी हिसका दाखविला असता, त्याने दुसरी व्यक्तीही त्याचेच ट्रकवर चालक म्हणून काम करणारा प्रकाश साहू (रा. छिंदवाडा) असल्याचे सांगितले. त्याच्या कबुली जबाबानुसार प्रकाश साहू, नंदकिशोर व त्याने अकोला येथून नागपूरकरिता सोयाबीनची ट्रिप घेतली. सदर सोयाबीनचा ट्रक लुटल्याचा बनाव करून ते सोयाबीन अन्य व्यापाऱ्याला विकून फसवणुकीचा कट रचला होता. त्याप्रमाणे त्यांनी ते सोयाबीन नागपूरला न नेता छिंदवाडा येथे नेले. तेथे एका व्यापाल्याला पूर्ण माल विकला. मात्र, नंदकिशोर हा दारू पिऊन कुठे वाच्यता करेल व आपले बिंग फुटेल या भीतीपोटी दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला. शिरखेड हद्दीत त्याचा मृतदेह फेकून दिला. चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला व नंतर सदर गुन्ह्यातील ट्रक नागपूर रोडवर पो.स्टे. नांदगाव पेठ हद्दीत आणून सोडून दिला व परत छिंदवाडा येथे निघून गेले.
सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना ४८ तासांच्या आत जेरबंद केले असून गुन्ह्यातील अपहार केलेला संपूर्ण माल हस्तगत केला. सदर कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. अपर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, तसेच शिरखेडचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, सपोनि गोपाल उपाध्याय, स्वप्नील ठाकरे, सचिन भोंडे, पोउपनि विजय गराड, पोलीस नाईक अंमलदार मनोज टप्पे पो कॉ.अमित आवारे, छत्रपती कारपाते, अनूप मानकर, रामेश्वर इंगोले, सूरज सुसतकर, आशिष चौधरी व स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल येथील पथकाने केली.