मंगेश पांडे, पिंपरी-चिंचवड (पुणे)उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), विविध न्यायालये, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र आणि कृषी उत्पन्न उपबाजार समिती अशी प्रमुख शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यात पिंपरी-चिंचवड शहर यशस्वी ठरले आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेले मोशी आता प्रमुख शासकीय कार्यालयांचे ‘हब’ होणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून मोशीतील सेक्टर क्र. ६ आणि ८ येथे २१० एकर जागेत आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातील विविध गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तसेच सेक्टर क्रमांक ६ येथे तीन एकर जागेवर अद्ययावत असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय साकारले जात आहे. चिखली येथे प्राधिकरणाच्या इमारतीत भाडेतत्त्वावर उपलब्ध जागेतील आरटीओ लवकरच मोशीत स्थलांतरित होणार आहे. वाहनचालकांची चाचणी घेण्यासाठी अत्याधुनिक असा ‘ट्रॅक’ उपलब्ध होणार आहे. यासह या इमारतीच्या शेजारीच प्राधिकरणाकडून ‘ट्रॅफिक पार्क’ तयार करण्यात आला आहे. मोशीतच कृषी उत्पन्न उपबाजार समिती सुरू केली आहे. तालुक्यासह तालुक्याबाहेरीलही शेतकरी या ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. प्राधिकरणाकडून न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी मोशी प्राधिकरणातील १५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. न्यायालय उभारणीसाठी शासनाने निधीही मंजूर केला आहे. महापालिकेच्या इमारतीतील दिवाणी-फौजदारी न्यायालय मोशीतील नव्या जागेत स्थलांतरित होणार आहे.
मोशीत शासकीय कार्यालयांचे ‘हब’
By admin | Published: May 03, 2015 1:14 AM