ठाणे : ठाणे महापालिकेने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या केलेल्या सर्व्हेक्षणात ठाण्यातील प्राईम लोकेशन अर्थात नौपाड्यात सर्वाधिक ४३ इमारती अतिधोकादायक ठरल्या आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसात या इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. मागील वर्षी या भागात केवळ ५ इमारती अतिधोकादायक ठरल्या होत्या. परंतु, भाडेकरू आणि मालकांमध्ये असलेले वाद, न्यायालयात असलेली प्रलंबित प्रकरणे या सर्व कारणांमुळे जुने ठाणे अशी ओळख असलेल्या नौपाडा परिसरातील धोकादायक इमारतींवर पालिकेला अपेक्षेप्रमाणे कारवाई करता आली नव्हती. त्यामुळे यंदा हा आकडा फुगल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाणे पालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून शहरात आतपर्यंत ३ हजार ६०७ इमारती धोकादायक असल्याचे उघड झाले आहे. कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी शासनाने नवे धोरण आखले असून या नव्या धोरणानुसार पालिकेने हे सर्व्हेेक्षण केले आहे. यानुसार अतिधोकादायक, राहण्या अयोग्य व तत्काळ निष्कासित करणे अशा सी - १ प्रकारामध्ये शहरातील एकूण ८८ इमारतींचा समावेश असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४३ इमारती या केवळ नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत आहेत. दरवर्षी मुंब्रा प्रभाग समितीत हे प्रमाण जास्त असल्याने पालिका प्रशासनाला या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे लागत होते. मात्र गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी मुंब्य्रामध्ये जवळपास २७ अतिधोकाद्यक इमारतींवर पालिकेने हातोडा चालवल्याने या परिसरात सी- १ या प्रकारामध्ये केवळ ८ इमारती आल्या आहेत. नौपाडा प्रभाग समितीमध्ये मात्र हे प्रमाण कितीतरी पटीने वाढले असून गेल्या वर्षी केवळ ५ इमारती अतिधोकादायक असताना यावर्षी मात्र हा आकडा ४३ वर गेला आहे.मालक आणि भाडेकरू यामध्ये असलेले वाद त्यामुळे या जुन्या इमारतींच्या विकासाला खीळ बसली असल्याने या इमारती अधिक जीर्ण झाल्या आहेत. परिणामी पालिकेला देखील अशा जीर्ण इमारतींवर अपेक्षित कारवाई करता न आल्याने त्यांची संख्या वाढली आहे.
नौपाड्यात सर्वाधिक ४३ अतिधोकादायक इमारती
By admin | Published: May 19, 2016 3:36 AM