मुंबई : नोटाबंदीनंतर एटीएमबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या दोन महिन्यांत परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच राज्यभरात पुन्हा हेच चित्र पाहायला मिळत आहे. बहुतांश एटीएमच्या दरवाजावरच ‘कॅश’ नसल्याचे फलक लागले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरत असून, पुण्यात याचा उद्रेक होऊन सोमवारी बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएमची तोडफोड करण्यात आली.मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत रोकड टंचाई जाणवत आहे. औरंगाबाद शहरातील साडेसातशे एटीएमपैकी केवळ दहा ते बारा एटीएम सुरू आहेत. स्टेट बँकांचे विलीनीकरण आणि ‘मार्च एंड’मुळे ही स्थिती उद्भवल्याचे कारण बँकांकडून देण्यात आले. दोन दिवसांत परिस्थिती सुधारेल, असेही सांगण्यात आले. परंतु आता एप्रिलची १० तारीख उजाडली तरी, बहुतांश एटीएम ‘कॅशलेस’च आहेत. यामुळे उन्हाच्या तापासोबतच नागरिकांना चलन तुटवड्याचा तापही सोसावा लागत आहे.परभणी जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. येथे विविध बँकांची ९० एटीएम केंद्रे आहेत. मात्र एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने अनेक बँकांनी एटीएम बंद ठेवली आहेत. त्यामुळे ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बँकेकडून शहराला कमी वित्तपुरवठा होत असल्याचे बँक युनियनचे नेते देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. तथापि, रिझर्व्ह बँकेकडूनच चलनपुरवठा होत नसल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे असले तरी, तो का घटला आहे, याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. नागपूर शहरातील अनेक भागामधील एटीएम अजूनही रिकामेच आहे. नागरिकांनी पैशांसाठी भटकंती करावी लागते. शहरातील रामदापेठ, सीताबर्डी, सदर, मेडिकल चौक आदी परिसरातील एटीएम काही काळ सुरू असतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
परराज्यांतून नोटा मागविल्याठाणे जिल्ह्यातील काही बँकांनी दिल्ली, पंजाब, हरियाणातील आपल्या शाखांत कर्मचारी पाठवून तेथून नोटा आणण्यास सुरूवात केल्याने नव्याने निर्माण झालेले हे नोटासंकट आणखी काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत. रोख रकमेची ही चणचण ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर अशा शहरांप्रमाणेच मुरबाड-शहापूरसारख्या निमशहरी भागांतही जाणवू लागली आहे. त्याचा फटका किरकोळ व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना बसू लागला आहे. बँकांमध्ये रांगा लावूनही रोख रक्कम मिळत नसल्याने, त्यासाठी तीन-तीन दिवस खेटे घालायला लागत असल्याने तेथे कर्मचारी आणि ग्राहकांत वाद झडत आहेत.पुणे, पिंपरीतही खडखडाटपुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरांतील जवळपास सर्व खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएममध्ये गेल्या काही दिवसांपासून खडखडाट दिसून येत आहे़ ऐन पगाराच्या काळात एटीएममधून पैसेच निघत नसल्याने कामगार वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील मध्य वस्तीबरोबरच उपनगरांमधील बहुसंख्य एटीएमवर ‘नो कॅश’ चे बोर्ड लागले दिसत आहेत़ ज्या काही मोजक्या ठिकाणी पैसे आहेत, तेथे केवळ २ हजार रुपयांच्याच नोटा उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी एटीएममध्ये वीजही नाही़ काही ठिकाणी मशीनमध्ये डेबिटकार्ड टाकून ट्रॅन्झॅक्शन सुरू केल्यावर सर्वात शेवटी ‘नो कॅश’चा मेसेज येतो. त्यामुळे नागरिकांना मनस्तापही होत आहे़ सांगवीत एटीएमची तोडफोड नुकसाननोटाटंचाईने त्रासलेल्या ग्राहकांचा संयम सुटल्याने सोमवारी काही जणांनी सांगवीतील बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएमची तोडफोड केली. शनिवार, रविवार बँकांचे कामकाज बंद असल्यामुळे नागरिक सोमवार उजाडण्याची प्रतीक्षा करीत होते. सोमवारीसुद्धा पैसे न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी सांगवीतील एटीएमची तोडफोड केली. मुंबईतील स्थिती हळूहळू पूर्वपदावरगेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोलमडून पडलेली एटीएम सेवा हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम पुन्हा सुरू झाले असले, तरी खासगी बँकांची एटीएम अद्याप बंदच आहेत. रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमधून खासगी, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांना सारख्याच प्रमाणात नोटा मिळत आहेत़ नोटांचा तुटवडा नाही़ लोकांनी डिजिटल व्यवहाराकडे वळावे यासाठी खासगी बँकांनी एटीएममधील नोटा भरणा करण्याचे प्रमाण कमी केल्याने एटीएम रिकामी झाली आहेत़ त्याचा ताण सरकारी बँका व त्यांच्या एटीएमवर आला आहे़ - विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-आॅप. बँक फेडरेशन