ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने ठाणे (कोकण) परिक्षेत्रात राबविलेल्या कारवाईमध्ये १ जानेवारी ते १० डिसेंबर २०२० या वर्षभराच्या कालावधीत ४४ सापळे लावण्यात आले. यात ६६ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सहा विभागांतील सर्वाधिक २५ गुन्हे ठाण्यात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लाच देऊ नये आणि कोणी सरकारी कर्मचाऱ्याने ती घेऊ नये, असे वारंवार आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केले जाते. तरीही अगदी क्षुल्लक कामांसाठीही सामान्य व्यक्तींची अडवणूक होते. ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा विभागांचा कोकण परिक्षेत्रात समावेश होतो. २०१९ मध्ये कोकण परिक्षेत्रात १०९ गुन्हे दाखल झाले होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी ही घट झाल्याचे बोलले जात आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृतीसह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा २०२० मध्ये ठाणे परिक्षेत्रात एकूण ४३ सापळे लावण्यात आले. यामध्ये एक अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये वर्षभरात ६६ लाचखोर सापळ्यात अडकले. यामध्ये २५ लाचखोरांना ठाण्यातून अटक झाली. त्यापाठोपाठ पालघर विभागात सहा, नवी मुंबई आणि रायगड विभागात प्रत्येकी चार, रत्नागिरीत तीन आणि सिंधुदुर्गमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली. यंदाही लाचखोरीत महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभाग अव्वल क्रमांकावर होते. त्यापाठोपाठ पोलीस कर्मचारी लाचेच्या सापळ्यात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२०२० मध्ये विभागनिहाय कारवाईठाणे २५पालघर ६नवी मुंबई ४रायगड ५रत्नागिरी ३सिंधुदुर्ग १एकूण ४४एकूण अटक ६६