- नारायण जाधवठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, येत्या २१ फेबु्रवारीला मतदान तर २३ फेबु्रवारीला ठाण्याचा ‘ठाणेदार’ कोण? ते ठरणार आहे. गेल्या २० वर्षांत शिवसेनेने या महापालिकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. शिवसेनेला राज्यात पहिल्यांदा ठाणे महापालिकेत दिवंगत आनंद दिघे यांच्या जादूई करिश्म्यामुळे सत्ता मिळाली. सतीश प्रधान यांच्या रूपाने राज्यातील शिवसेनेचा पहिला महापौर याच महापालिकेत बसला. त्यानंतर, मधील पाच वर्षे वगळता शिवसेनेच्या ताब्यात ठाणे महापालिका राहिली आहे. सध्या महापालिकेत शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आहे. ती स्वबळावर टिकवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे.हिंदीमधील ‘सौदागर’ या राजकुमार आणि दिलीपकुमार यांच्या चित्रपटातील एक लोकप्रिय डायलॉग आहे. ‘सबसे खतरनाक दुष्मन कौन,’ त्याचे उत्तर ‘सबसे पुराना दोस्त’ असे दिले गेले आहे. तशीच काहीशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. या खेपेला तिचा प्रमुख विरोधक मित्रपक्ष भाजपा हाच आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी अन् काँग्रेसचा नंबर लागतो.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकलज्जेस्तव सध्या शिवसेना-भाजपात ‘युती’चे तर काँगे्रस-राष्ट्रवादीत ‘आघाडी’च्या चर्चेचे गुऱ्हाळ चालू आहे. नेते युती किंवा आघाडीची करीत भाषा केली असले, तरी सामान्य कार्यकर्त्यांना युती किंवा आघाडी नकोच आहे. ठाणे शहरात आघाडी व कळवा-मुंब्रा येथे मैत्रीपूर्ण लढतीच्या धोरणामुळे सामान्य काँगे्रसजन वैतागले आहेत. त्याचबरोबर, मुंबईत शिवसेनेबरोबर युती करायला उत्सुक असलेल्या भाजपाला नागपूरमध्ये शिवसेनेला बरोबर घ्यायचे नाही. यामुळे सध्याचे वातावरण पाहता ‘युती’त कलगीतुरा, तर ‘आघाडी’त बिघाडी असेच दिसत आहे.ठाण्यात गुरुवारी झालेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतही स्वबळाचाच सूर उमटला आहे. एके काळी छोटे भावंड असलेला भाजपा लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मोठा भाऊ कधी झाला, तेच शिवसेनेच्या धुरिणांना कळले नाही. एके काळी जी मुस्कटबाजी शिवसेनेकडून भाजपाची होत होती, तीच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी अधिक आता भाजपा शिवसेनेची करीत असून, मागे झालेल्या अपमानाचा वचपा काढत आहे. मग ते राज्य मंत्रिमंडळातील निर्णय घेण्यापूर्वी विश्वासात न घेणे असो वा पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मानाचे स्थान देणे असो. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना प्रबळ, तर भाजपा लुकडी अशी स्थिती होती. त्या निवडणुकीत कलगीतुरा चांगलाच रंगला होता. कुणी वाघाची डरकाळी फोडण्याची भाषा करीत होते, तर कुणी वाघाच्या तोंडात हात घालून दात मोजण्याची वक्तव्ये करीत होते. त्या निवडणुकीत स्वबळावर लढलेली भाजपा ९ जागांवरून ४२ जागांवर गेली. मोदी-फडणवीस यांचा करिष्मा व सत्तेची ताकद या जोरावर चौपट यश मिळाल्याने भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. ठाण्यातील शिवसेनेवर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची मजबूत पकड आहे. शिंदे हे कष्टाळू नेते आहेत. ते अहोरात्र काम करतात. निवडणूक काळात एकही कच्चा दुवा न सोडता ‘फिल्डिंग लावणे’ ही त्यांची खासियत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपाच्या सत्ता सामर्थ्यापुढे शिवसेनेचा वारू टिकवून ठेवण्यात व सत्ता हस्तगत करण्यात शिंदे यांचाच सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संघटन कौशल्य पणाला लागलेले दिसेल.ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी नंबर दोनचा पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीतही मुंब्रा मतदार संघ ताब्यात ठेवून जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे आव्हान ताजे ठेवले आहे. किंबहुना ते वाढवले आहे. त्यातच शिवसेनेचे मित्र असलेल्या राजन किणे सारख्या नगरसेवकांना पक्षाच्या तंबूत आणून, कळवा मुंब्रातून एकूण ३४ पैकी २५ ते ३० नगरसेवक निवडून आणण्याचे मनसुबे रचले आहेत. काँगे्रसची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी झालेली आहे. पक्षाच्या नेतेमंडळींत एकमत होत नाही. श्रेष्ठींना याचे काहीही पडलेले दिसत नाही. म्हणूनच या खेपेला ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.ठाण्यापुरते बोलायचे झाल्यास, सध्याच्या एकूण १३० सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत शिवसेना ५६, भाजप ०८, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ३४, इतर १० आणि अपक्ष ०७ असे संख्याबळ आहे. शिवसेनेचा महापौर असून, मनसेचे बहुतेक नगरसेवकांनी शिवबंधन हातात बांधले आहे. याशिवाय बसपाचा नगरसेवकही शिवसेनेत सामील झाला आहे. भाजपाचे अवघे आठ नगरसेवक असून, युतीच्या करारानुसार उपमहापौरपद भाजपाकडे आहे. शिवाय स्थायी समिती सभापती अखेरच्या वर्षात भाजपाच्या वाट्याला आले आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहरातून संजय केळकर यांनी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारास धूळ चारून कमळ फुलवले, शिवाय विधान सभेच्या इतर तीन मतदारसंघातही भाजपाने चांगली मते घेतली आहेत. त्यांची आकडेवारी पाहता, भाजपाला या वेळी समसमान जागा हव्या आहेत. अर्थातच, त्या द्यायला शिवसेना तयार नाही.न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले कल्स्टर, दिवा येथील डम्पिंगचा प्रश्न, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सूरज परमार आत्महत्या प्रकरण, रखडलेली पाणीयोजना या मुद्द्यांभोवती ठाण्यात या वेळच्या निवडणुकीचा प्रचार फिरणार आहे. हे मुद्दे सत्ताधारी शिवसेना-भाजपाला गेल्या २० वर्षांत सोडवता आलेले नाहीत. उलट टक्केवारी आणि ठेकेदारीच्या गर्तेत ही महापालिका अडकलेली आहे. बहुचर्चित नंदलाल समितीचे भूत अजूनही या महापालिकेतील अनेक ज्येष्ठांच्या मानगुटीवर बसलेले आहे. यातील काही जण खासदार, आमदार झालेले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेतील कंत्राटात ४१ टक्के रक्कम घेतली जाते, असा आरोप करून स्व. आनंद दिघे यांनीच शासनाकडे तक्रार करून नंदलाल समितीची चौकशी लावली होती. यात सत्ताधारी पक्षासह काँगे्रस-राष्ट्रवादीची मंडळीही होती. सध्या भाजपा हा राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांना चिरडू पाहात आहे. ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आहेत. राष्ट्रवादीची अशी ताकद मुंबईत नाही. त्यामुळे प्रादेशिक अस्मिता टिकवण्याकरिता हे दोन पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. कळवा-मुंब्रा येथील झोपड्यांच्या विषयावर या दोन्ही पक्षाचे नेते अलीकडेच एकत्र आले होते, हे बोलके मानले जाते.ठाणेदार कोण?क्लस्टर रखडल्याने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अधुरे राहिले आहे. मात्र, दुसरीकडे बिल्डर मात्र, डोंगर पोखरून आणि खाडी बुजवून आपले इमले उभे करीत आहेत. त्यांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा देऊन, आपण सारे भाऊ भाऊ सर्व मिळू खाऊ, हे धोरण अंगीकारल्याचे दिसत आहे.ठाण्यापुरते बोलायचे झाल्यास, सध्याच्या एकूण १३० सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत शिवसेना ५६, भाजप ०८, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ३४, इतर १० आणि अपक्ष ०७ असे संख्याबळ आहे. शिवसेनेचा महापौर असून, मनसेचे बहुतेक नगरसेवकांनी शिवबंधन हातात बांधले आहे.याशिवाय बसपाचा नगरसेवकही शिवसेनेत सामील झाला आहे. भाजपाचे अवघे आठ नगरसेवक असून, युतीच्या करारानुसार उपमहापौरपद भाजपाकडे आहे. शिवाय स्थायी समिती सभापती अखेरच्या वर्षात भाजपाच्या वाट्याला आले आहे.
(लेखक लोकमत ठाणे जिल्हा ब्युरो चिफ आहेत.)