अमरावती - महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुखांनी विचाराची ज्योत पेटवून ती देशपातळीवर तेवत ठेवली. मात्र आजमितीला शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे क्रांतिकारी भूमीतच शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याची खंत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आशुतोष यांनी रविवारी येथे व्यक्त केली.आपच्या वतीने अमरावतीत आयोजित राज्यव्यापी शेतकरी, शेतमजूर परिषदेला ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना आशुतोष यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारावेळी शेतक-यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. अवेळी पाऊस, सतत नापिकी, शेती उत्पादनाला भाव नाही, असा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजही अन्नदात्याला आत्महत्या करावी लागत असेल, तर ती राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे.केंद्र सरकार विकासाच्या नावाने विविध प्रकल्पांची पायाभरणी करीत असले तरी या विकासाच्या आर्थिक सुधारणेत शेतक-यांना कुठेही स्थान नाही. देशात झपाट्याने प्रगती केली, हा गवगवा केला जात असून शेतक-यांसाठी सिंचन, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत सुविधा का पुरविली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने उद्योजकांचे ४.५० लाख कोटींचे कर्ज माफ केले तर शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका का घेतली जात नाही, ही बाब त्यांनी उपस्थित केली. केंद्र सरकार हे सत्ता आणि संपत्तीच्या बळावर चालत असून मोदी, शहा, अंबानी व अदानी यांच्या भयातून देशमुक्त करावा लागेल, अशी भावनिक साद त्यांनी घातली. देशाला सत्ता, संपत्तीच्या भयातून मुक्त करण्यासाठी आपच्या वतीने दिल्ली येथे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी रामलीला मैदानावर होणा-या मेळाव्यात उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आशुतोष यांनी केले. यावेळी मंचावर आपचे नेते रंगा राचुरे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, गजानन अमदाबादकर, चंद्रकांत वानखडे, पंकज गुप्ता, प्रिती शर्मा-मेमन, आलोक अग्रवाल आदी उपस्थित होते.- तर शिल्पा शेट्टी हिने आत्महत्या का केली नाही?दारू पिण्याचे प्रमाण हे चित्रपटसृष्टीत अधिक आहे. तरीदेखील शिल्पा शेट्टी हिने दारू पिऊन कधी आत्महत्या केली नाही, अशी बोचरी टीका शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांनी केंद्र सरकारवर केली. काही दिवसांपूर्वीे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शेतकरी दारू प्राशनाने आत्महत्या करीत असल्याचे उद्गार काढले होते, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. केंद्र सरकार सीमेवर रक्षण करणा-या सैनिकाला अनुदानातून अधिकृत दारू देते तर, अन्न सुरक्षा करणा-या शेतक-यांना वेगळा न्याय का, असा सवाल वानखडे यांनी उपस्थित केला. चित्रपटसृष्टी, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार हेसुद्धा दारू पितात. यापैकी कोणीही दारू पिऊन आत्महत्या केल्या नाहीत. परंतु शेतकरीच का दारू पिऊन आत्महत्या करतो? याचे चिंतन सगळ्यांनाच करावे लागेल. त्यामुळे आता राजकीय पर्याय उभा करावा लागेल, ही बाब त्यांनी आवर्जून मांडली.
क्रांतिकारी भूमीत शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या, आपच्या राज्यव्यापी शेतकरी, शेतमजूर परिषदेत प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 8:00 PM