- सुधीर लंकेराज्यातील खासदारांमध्ये मराठा समाजाचा टक्का सर्वाधिक ४३ टक्के आहे. कुणबी खासदारांची संख्या ८ टक्के तर ब्राह्मण व चर्मकार समाजातील खासदारांची संख्या प्रत्येकी ६ टक्के आहे. या चार जातींच्या खासदारांची संख्या ६४ टक्क्यांच्या घरात जाते.
राष्टÑवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष असल्याची टीका होते. मात्र, आकडेवारी पाहिली तर गत दोन लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीकडून मराठा समाजाला सर्वाधिक उमेदवारी देण्यात आली. २०१४ मध्ये सेना-भाजपने १८ तर दोन्ही काँग्रेसने १६ मराठा उमेदवार दिले होते. यंदा युतीने २२ तर दोन्ही काँग्रेसने १४ मराठा उमेदवार दिले. पक्षनिहाय विचार करता सेनेने सर्वाधिक १४, राष्टÑवादीने ११, भाजपने ८ तर काँग्रेसने ३ मराठा उमेदवार दिले होते. मराठा समाजाचे २१ (४३ टक्के) उमेदवार निवडून आले आहेत. त्यात सेनेचे १२, भाजपचे ७, तर राष्टÑवादीचे २ खासदार आहेत. २०१४ मध्ये मराठा समाजातील खासदारांची संख्या २० (४१ टक्के) होती. यंदा ती २१ झाली.कुणबी समाजाचे यंदाही चार (८.३३ टक्के) खासदार निवडून आले. कुणबी समाजातून काँग्रेसने ५, राष्टÑवादीने १ तर सेना-भाजपने प्रत्येकी २ उमेदवार दिले होते. त्यापैकी भाजपचे २, तर शिवसेना व काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार झाला. कुणबी समाजानंतर ब्राह्मण समाजाला संधी मिळाली आहे.अन्य समाजांचा प्रत्येकी एक खासदारलिंगायत, मुस्लिम, गुजराथी, वंजारी, आगरी, सीकेपी, गवळी, लेवा पाटील, माळी, बौद्ध, खाटिक, शेट्टी, तेली या समाजघटकांतून प्रत्येकी एक खासदार संसदेत पोहोचला आहे. आदिवासी समाजातून चार खासदार संसदेत गेले आहेत. या चारपैकी तीन खासदार हे भाजपचे तर एक सेनेचा आहे. धनगर समाज आरक्षणाच्या प्रश्नावरुन आक्रमक आहे. मात्र, या समाजातून प्रमुख राजकीय पक्षांकडून यावेळी एकही उमेदवार नव्हता.
लोकसंख्येत मराठा समाजाचे प्रमाण अधिक असल्याने सर्वांनी त्यांना उमेदवारीत प्राधान्य दिल्याचे दिसते. वास्तविक ‘इलेक्टिव्ह मेरिट’मुळे अनेक जाती सत्तेपासून वंचित राहतात.- डॉ. सर्जेराव निमसे, सदस्य, राज्य मागासवर्ग आयोग