डिप्पी वांकाणी, मुंबई वाकोला पोलीस ठाण्याच्या साहाय्यक फौजदाराने आत्महत्या करण्यापूर्वी वरिष्ठ निरीक्षक आणि अन्य एका सहकाऱ्यावर केलेल्या गोळीबाराने पोलिसांवरील कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रीय गुन्हा नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार २०१३मध्ये महाराष्ट्रात झालेल्या पोलिसांच्या आत्महत्या देशात सर्वाधिक होत्या, हे दाहक वास्तवही यानिमित्ताने चर्चेत येणार आहे. कामाचा वाढता ताण, साप्ताहिक सुट्या आणि रजा रद्द करणे तसेच वरिष्ठांच्या जाचामुळे राज्यातील पोलिसांत नैराश्य वाढले आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. सर्वाधिक रजा कोणाच्या रद्द होत असतील तर त्या कॉन्सटेबलच्या. साहाय्यक उपनिरीक्षक पोलिसांकडील कामे निश्चित करतात. तसेच त्याच्याकडे मोबाईल व्हॅनचीही जबाबदारी असते. कामाच्या वाढत्या ताणामुळे साप्ताहिक सुट्ट्याही रद्द केल्या जातात. अनेकदा ३-४ महिने सुटी न घेता सलग काम करावे लागते,असे एका पोलिस कॉन्स्टेबलने सांगितले. वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक अत्यंत उद्धट आणि अपमानास्पद असते. पोलिसांवर खेसकून त्यांच्याकडून कामे करून घेण्यात वरिष्ठांना स्वारस्य असते. त्यामुळेच वरिष्ठांबद्दल चीड निर्माण होत जाते. तणाव दूर करुन मानसिक संतुलन राखण्यासाठी योगाभ्यासोबत तणावमुक्तीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जायचे. परंतु, या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याऐवजी एक दिवसाची सुटी देण्याचा पोलिस आग्रह करतात. अधुनमधून प्रोत्साहन मिळावे म्हणून हिंदी चित्रपट दाखविले जायचे. परंतु, हे सर्व कार्यक्रम निष्फळ ठरल्याने हे सर्व थांबविण्यात आले, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यात पोलीस आत्महत्या सर्वाधिक
By admin | Published: May 04, 2015 2:26 AM