- सतीश डोंगरे, नाशिक
सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्याच्या संपर्कात येणाऱ्यांनाही (पॅसिव्ह स्मोकिंग) धुरामुळे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यात चिमुकले सर्वाधिक बळी पडतात. काही तर गर्भाशयातच या विषाला बळी पडत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य कल्याण विभाग व वर्ल्ड लंग फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आला आहे. ‘टोबॅको इज इटिंग युवर बेबी अलाईव्ह’ या मोहिमेअंतर्गत राज्यभरात सर्वेक्षण केले गेले. त्यात पॅसिव्ह स्मोकिंगमुळे चिमुकल्यांना होणाऱ्या दुर्धर आजाराचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. पॅसिव्ह स्मोकर्स ठरणाऱ्या गर्भवती महिलांच्या शरीरात सायनाइड आणि कार्बन मोनॉक्साइडसारखे विषारी वायू शिरकाव करतात. त्याचा बाळावर परिणाम होतो. बऱ्याचदा पॅसिव्ह स्मोकिंगमुळे मुले गर्भातच दगावण्याची शक्यता असल्याचे यात आढळले आहे. त्यामुळे घरात धूम्रपान करणे धोकादायकच आहे. लहानग्यांवर परिणाम...पॅसिव्ह स्मोकिंगमुळे अस्थमा, कानाचा संसर्ग, न्यूमोनिया, जन्माच्या वेळी नवजात अर्भकांचे वजन कमी होणे, सडन इन्फण्ट डेथ सिंड्रोम (एसआयडीएस) या दुर्धर आजारांसह लहानग्यांच्या प्रकृतीवर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या आजारांचीही लागण होते. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे जगभरात वर्षाकाठी ६० हजार लहानग्यांचा बळी जात असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले. कुटुंबातीलच व्यक्तींकडून धोका...महाराष्ट्रातील १२ टक्क्यांहून अधिक प्रौढ पुरुष धूम्रपान करतात. यातील बहुतेक पुुरुष घरातच धूम्रपान करीत असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. तंबाखूच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी पाच दशलक्षहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूच्या सेवनावर नियंत्रण आणल्यास यातील दहापैकी एकाचा मृत्यू टाळता येऊ शकतो, असेही सर्वेक्षणात नमूद केले आहे. सर्वेक्षणातील निष्कर्ष...एखादी व्यक्ती धूम्रपान करीत असेल, तर साधारणपणे अशा ४० टक्के कुटुंबातील मुले त्यांच्या संपर्कात येतात. तर ५० टक्के मुले सार्वजनिक ठिकाणच्या धुम्रपानाला बळी ठरतात. ग्लोबल यूथ टोबॅको सर्वेक्षणात (इंडिया) १३ ते १५ वर्ष वयोगटातील किमान २१ टक्के मुले घरी तर किमान ३६ टक्के मुले घराबाहेरच्या पॅसिव्ह स्मोकिंगला बळी पडत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदविला आहे. संशोधनात ७० टक्के व्यक्ती सुट्या सिंगारेट ओढत असल्याचे समोर आले. तरुणाईमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे.