लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पीएचडीसाठी झालेल्या संशोधनाचा पुढे फारसा उपयोग होत नाही असे सांगत राज्यातील संशोधनाबाबतच शंका व्यक्त करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निम्म्याहून अधिक पीएच.डी. चे शोधप्रबंध ‘कॉपी पेस्ट’ किंवा वेतनवाढ आणि पात्रता मिळविण्यासाठीच केलेले असतात, अशी खंत जाहीरपणे व्यक्त केली. भारती विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, भीमराव तापकीर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील आदी उपस्थित होते. राज्यातील विद्यापीठांमध्ये होत असलेले संशोधन आणि शोधप्रबंधांच्या स्थितीवर बोलताना तावडे म्हणाले, विद्यापीठांमध्ये पीएचडी साठी सादरे केले जाणारे निम्म्याहून अधिक प्रबंध कॉपी पेस्ट असतात. इतर प्रबंधांमधून ते घेतले जातात. केवळ वेतनवाढ मिळविणे, प्राचार्य किंवा विभागप्रमुख म्हणून बढती मिळण्यासाठी आणि नावापुढे ‘डॉक्टर’ लावण्यासाठी प्रबंध सादर केले जातात. हे संशोधन पुढे उपयोगात येताना दिसत नाही. मोहनदास पै समितीच्या अहवालानुसार राज्यातील पीएच.डी.पैकी १.०३ टक्के प्रबंधांचे संदर्भ (सायटेशन) वापरले जातात. संशोधनाचा वापर पुढील संशोधनासाठी होऊन संशोधन केंद्रे उभी राहणे महत्वाचे आहे. यासाठी सर्व विद्यापीठांना त्यांच्या प्रबंधाची माहिती आॅनलाईन टाकण्यास सांगितले आहे.त्यामुळे प्रबंधांची नक्कलही होणार नाही. सध्या शिक्षणामधून बेकारांची फौज निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देण्याची गरज असल्याचेही तावडे म्हणाले.
बहुतांश शोधप्रबंध ‘कॉपी पेस्ट’
By admin | Published: May 11, 2017 2:55 AM