राजेश भोजेकरचंद्रपूर : समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या जखमांवर मायेची फुंकर घालणाऱ्या बाबा आमटे यांच्या आनंदवनात नैराश्येपोटी कधी कुण्या कुष्ठरोग्याने आत्महत्या केली नाही. मग, बाबा व ताईंची नात, डाॅ. विकास व भारती आमटे यांची उच्चशिक्षित कन्या डाॅ शीतल यांनीच हे टोकाचे पाऊल का उचलले? गेल्या काही वर्षांमधील घटनाक्रम पाहता जुन्या पिढीने मोठ्या परिश्रमाने जपलेला ध्येयवाद आणि नव्या पिढीच्या महत्त्वाकांक्षा यांच्यातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघर्षाची ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल.
- गौतम करजगींसोबत विवाह झाल्यानंतर दोघेही काही काळ परदेशात होते.
- सन २०११-१२ मध्ये डाॅ. शीतल आमटे-करजगी आनंदवनात आल्या.
- २०१४-१५ मध्ये पती गौतम करजगीसुद्धा आनंदवनात आले.
- डाॅ. शीतल शिक्षण व पर्यावरणावर काम करायच्या. त्यांना पेंटिंग्जचा छंद होता.
- २०१७ मध्ये त्या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या.
- २०१८ पासून पती गौतम करजगी यांच्याकडे आनंदवनच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी.
- १७ ऑक्टोबर २०१९ रोजी संस्थेच्या सेवा कार्यात वर्तन विसंगत असल्याबाबत राजू सावसाकडे यांना महारोगी सेवा समितीचे घर खाली करण्याबाबत नोटीस. यावरून उभयतांमध्ये आरोप- प्रत्यारोप.
- लाॅकडाऊनच्या काळात डाॅ. शीतल आमटे-करजगी यांची आई भारती आमटे, भाऊ कौस्तुभ आमटे व त्यांची पत्नी पल्लवी व मुलीसह आनंदवनातून बाहेर पडले. ते पुन्हा परतले नाही. कालांतराने डाॅ. विकास आमटे यांनीही आनंदवन सोडले.
- आनंदवनातील अंतर्गत वाद अनेकदा पोलिसात गेला. मात्र कुठलीही कारवाई नाही. डाॅ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावरून महारोगी सेवा समितीवर केलेल्या आरोपाचे २२ नोव्हेंबर रोजी आमटे कुटुंबीयांकडून जाहीर खंडन.
- आनंदवनातील अंतर्गत वाद आणि कौटुंबिक वादातून डाॅ. शीतल आमटे एकाकी पडल्या होत्या. यातून नैराश्य आल्याचा अंदाज.