पुणे : समृद्ध जीवन फूड्स इंडियाचा सर्वेसर्वा महेश मोतेवार याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांनी त्याला १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.महेश मोतेवारला सीआयडीने ओडिशा येथून अटक करून पुणे न्यायालयात हजर केले. सुनीता धनवे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मोतेवार याच्या समृद्ध जीवन फूड इंडिया लि. या कंपनीत धनवे यांनी जून २००९ मध्ये ५८०० रुपयांची गुंतवणूक केली होती. प्रत्येक वर्षासाठी ५८०० रुपये अशी रक्कम १० वर्षे भरायची होती. त्यानंतर, २०१९ मध्ये त्यांना ९५ हजार ७०० रुपये एवढी रक्कम मिळणे अपेक्षित होते. त्यांच्या पैशामधून शेळ्या, मेंढ्या असे पशुधन खरेदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. फायद्यांसंदर्भात धनवे यांनी समृद्धच्या कार्यालयात वारंवार विचारणा करूनही त्यांना परतावा, मूळ रक्कम मिळाली नाही. कंपनी जनतेकडून पैसे गोळा करीत असून, सेबीने या कंपनीवर पैसे गोळा करण्यास निर्बंध घातल्याचे व गुंंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना फसविल्याची माहिती धनवे यांना मिळाली. तक्रारीनंतर मोतेवारवर २० नोव्हेंबर २०१४ रोजी गुन्हा दाखल झाला.सेबीने कंपनीवर बंदी आणलेली असतानाही समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि. चे ग्राहक समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-आॅप सोसायटीमध्ये परस्पर वर्ग केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा आणखी तपास करायचा आहे. यासोबतच समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-आॅप सोसायटीकडून ४७१ कोटी ५९ लाख ६२ हजार २०१ रुपये समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेडकरिता घेतले होते. त्यापैकी ११० कोटी ५१ लाख १७ हजार ८२४ रुपये समृद्ध जीवन फूड्सने परत केले आहेत. हे पैसे कशासाठी घेण्यात आले? त्याचा वापर कुठे करण्यात आला? या प्रकरणांचाही तपास करण्यासाठी पोलिसांनी मोतेवारच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यासोबतच महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करायची असल्याने, महाराष्ट्रातील विविध कार्यालये व प्रोजेक्ट संदर्भात तपास करायचा असल्याने अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे यांनी मोतेवारच्या पोलीस कोठडीची मागणी केली. (प्रतिनिधी)
मोतेवारला सीआयडीकडून अटक
By admin | Published: April 01, 2016 1:31 AM