ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २८ : समृद्ध जिवनच्या महेश मोतेवार यांना अटक झाल्यानंतर सुरु झालेल्या छापा सत्रादरम्यान त्यांच्या पत्नीने लपविण्यासाठी चालकाकडे दिलेले तब्बल चार किलो सोन्याच्या दागिन्यांपैकी तीन किलो दागिने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. हे दागिने चालकाच्या घरामधून दरोडेखोरांनी चोरुन नेले होते. याबाबत तक्रार देऊ नकोस असेही मोतेरावांच्या पत्नीने चालकाला सांगून ठेवल्याचेही तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. पोलिसांनी एकूण 88 लाख 42 हजार 140 रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत.
निलेश भाऊसाहेब कोळपे (वय 31, रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड), वाल्मिक बिरा कोळपे (वय 30) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेणारे सोनार व्यंकटेश ऊर्फ पप्पू तुळशीदास दहीवाळ (वय 32, रा. गणेश कॉलनी, थेरगाव), प्रदीप ऊर्फ बाळू येसू गायकवाड (वय 45, रा. बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली), भारत ज्ञानदेव पडळकर (वय 37, रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन मोतेवारचा चालक नरहरी देवराम घरत (रा. भालके कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांची फिर्याद घेण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 23 लाख आणि वाकड येथील ह्यअॅमेझॉनह्णची 19 लाखांची तर रोकड लुटल्याप्रकरणी निलेश आणि वाल्मिक यांना अटक केली होत्री. त्यांच्याकडे अधिक तपास सुरु असताना आरोपींनी घरत याच्या घरामधून 4 किलो सोन्याचे दागिने मारहाण करुन लुटल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी तातडीने हालचाली करीत एक किलो दागिने जप्त केले. मात्र, याप्रकरणी गुन्हाच दाखल नसल्याचे तपासात समोर आले. आरोपींकडे कसून तपास करुन आणखी दोन किलो सोने हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, अन्सार शेख, उपनिरीक्षक विलास पालांडे, प्रमोद वेताळ, संतोष बर्गे, अमित गायकवाड, संजय गवारे, गणेश काळे, दिलीप लोखंडे, राजेंद्र शेटे, राजू मचे, राजाराम काकडे, धर्मराज आवटे, प्रविण दळे, प्रमोद लांडे, प्रमोद हिरळकर, स्वप्ंल शिंदे, गोपाळ ब्राम्हंदे यांच्या पथकाने केली. महेश मोतेवार यांना अटक झाल्यानंतर सीबीआयने त्यांच्या कार्यालय तसेच घरांवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यांची लीना मोतेवार यांनी घरामधील तब्बल चार किलो सोन्याचे दागिने दोन डब्यांमध्ये भरुन त्यांचा चालक नरहरी घरत याच्याकडे लपविण्यासाठी दिले होते. हे दागिने घरतच्या घरामधून कोळपे टोळीने मारहाण करुन लुटून नेले होते. याबाबत घरत यांनी चोरी झाल्याचे लीना मोतेवार यांना सांगितले. मात्र, लीना यांनी घरत यांच्यावरच संशय व्यक्त केला. तसेच त्यांना गावी राहण्यास पाठवून दिले. पोलिसांकडे तक्रार देऊ नकोस असेही लीना यांनी घरत यांना बजावले होते असेही पोलिसांनी सांगितले.मोतेवारचा चालक घरत आणि आरोपी एकाच भागात राहणारे आहेत. घरतच्या घरी नेहमी रात्री उशीरापर्यंत महागड्या आणि आलिशान मोटारींमधून कोणी ना कोणी येत असे. त्यामुळे आरोपींची नजर घरतवर गेली. त्यांना त्याच्याकडे घबाड मिळू शकते असा विश्वास वाटत होता. त्यामुळेच आरोपींनी घरतच्या घरावर दरोडा टाकला होता.