आई व मुलाचा मृतदेह आढळला भुसावळ :
शिवाजीनगरातील मथाईस इमारतीमध्ये उघडकीस आलेली घटना
भुसावळ : वृद्धापकाळात एकमेकाला आधार असलेल्या व एकत्र राहत असलेली वृद्ध आई आणि मुलाचा कुजलेला मृतदेह भुसावळ शहरात आढळून आला़ वृद्ध आई व मुलगा खिस्ती समाजातील असल्याने या समाजात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान यामागे कोणताही घातपात नसून हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे रहिवासी व पोलिसांनी सांगितले. शहरातील शिवाजीनगरातील मथाईस या स्वमालकीच्या इमारतीत सेंट अॅलायसीस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या ज्युली मॅथीव्ह डॅनियल आणि मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आॅर्डनन्स फॅक्टरीतून पर्यवेक्षक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेला त्यांचा मुलगा मोव्हीन मॅथीव्ह डॅनियल (वय ६२) हे एकमेकांच्या आधाराने जगत होते. आज या दोघा आई व मुलाचे कुजलेले मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे़ पोलीस व स्थानिक रहिवासी आणि ज्युली डॅनियल यांच्या नातेवाइकांनी सांगितले की, आज सकाळी आठ-साडेआठ वाजेच्या सुमारास मथाईस इमारतीच्या तळमजल्यावरून वरच्या मजल्यावर कुजल्याचा वास येऊ लागला. माशाही घोंघावत असल्याचे दिसले. त्यावरून इमारतीमधील रहिवासी एकत्र आले. त्यांनी कोठे काही सडले का याचा शोध घेतला. मात्र तसे काही दिसले नाही. ज्युली डॅनियल राहत असलेल्या घरातून वास येत असल्याचे लक्षात येताच नातेवाईक व रहिवासी यांनी हा प्रकार बाजारपेठ पोलिसांना सांगितला. तत्काळ बाजारपेठचे पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी दरवाजा तोडला व आत प्रवेश केला. आतील दृश्य पाहून पोलीसही दचकले. पहिल्या खोलीत स्वयंपाकघर व न्हानीजवळ मोव्हीन मॅथीव्ह पालथे पडले होते. त्यांचे शरीर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होते. त्यामुळे घरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. तर दुसर्या खोलीत त्यांच्या आई ज्युली यांचे प्रेत पलंगावर पडलेले दिसले. ते फारसे कुजलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली़पोलिसांनी लगेचच पंचनामा करून दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी न.पा. रुग्णालयात पाठविले. मात्र ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या भुसावळसारख्या शहरात शवविच्छेदनाची सोय नसल्याने पोलिसांनी मृतदेह वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून विच्छेदन करण्यात आले.नंतर ते ज्युली व मोव्हीन सदस्य असलेल्या सॅक्रीड हॉर्ट चर्चमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी चर्चचे फादर विली डिसोल्वा यांनी प्रार्थना म्हटली. त्यानंतर रेल्वे रुग्णालयाजवळील खिस्ती कब्रस्तानात या आई आणि मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मथाईस इमारत परिसरातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या कुटुंबाचा कोणाशीही फारसा संबंध नव्हता. त्यांचे घर नेहमी बंद असायचे. ज्युली डॅनियल अंथरुणावच होत्या. त्यांना उठताही येत नव्हते.शिवाजीनगरातील रहिवासी मतिल्डा जॉन मथाईस (वय ७७) यांनी दिलेल्या खबरीवरून बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप तरी समजू शकले नसले, तरी यात घातपात नसल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे़ याप्रकरणी पुढील तपास फौजदार आर.एस. साठे, शिवदास चौधरी व सहकारी करीत आहेत. शिवाजीनगरातील रहिवासी ज्युली मॅथीव्ह डॅनिअल या ८२ वर्षीय वृद्धा शहरातील सेंट अॅलायसीस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांना सेवानिवृत्त होऊन जवळपास २५ वर्षे झाली असावीत, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’ला मथाईस इमारतीच्या बाहेर दिली. ज्युली डॅनियल या वृद्धा गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. त्यांना उठताही येत नव्हते. मोव्हीन त्यांची अहोरात्र सेवा करीत असे. मोव्हीन पडल्याने त्याला दगड आदी काही तरी लागले असावे व त्यातच तो मरण पावला असावा. इकडे जेवण व पाणी आदी न मिळाल्याने ज्युुली यांचेही निधन झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. डॅनियल कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी सांगितले की, मोव्हीन ३० एप्रिल रोजी बाजारात गेले होते. घर दुरुस्तीसाठी त्यांनी विटा आणल्या होत्या. त्या वेळी ते बाजारात पडले होते. त्यांना इजा झाली होती. रिक्षाने घरी आल्यानंतर व घरात शिरल्यानंतर ते बाहेरच पडले नाहीत. ज्युली व मोव्हीन सॅक्रीड हॉर्ट चर्चचे सदस्य होते. सुरुवातीला आई-मुलगा नियमित चर्चमध्ये यायचे. नंतर मोव्हीन दर रविवारी चर्चमध्ये यायचे. त्यांचे कोणाशीही वैर नव्हते. ते सहसा बाहेरही पडत नसत. - थॉमस डिसोजा, आर.सी. चर्च सदस्य, भुसावळ.