- बी़ एम़ काळे, जेजुरी
ही गोष्ट आहे ११ वर्षांपूर्वीची... जेजुरी बसस्थानकात बेवारस स्थितीमध्ये एक मूल सापडले... प्रत्यक्ष जन्मदात्रीने ‘नकोशी’ झालेल्या एका मुलीला टाकून दिले होते. पण तिथे राहणाऱ्या एका साथीच्या मनात पितृत्वाची भावना जागी झाली. बेवारस स्थितीत सापडलेल्या या मुलीला माता-पित्यांचे प्रेम देत त्याने तिचा सांभाळ केला तिला शिक्षणासाठीही प्रवृत्त केले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही कहाणी. गेल्या ४५ वर्षांपासून जेजुरी शहरात व व्यापारीपेठेत रात्रीची गस्त घालून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या परमसिंह थापा या गोरखा वयोवृद्ध व्यक्तीमध्ये हे माणूसपण जागे झाले. वात्सल्य आणि मानवतेचे कृतीशील व संवेदनशील दर्शन त्यांनी घडवले. मूळचे आसाम राज्यातील पहाडी खेडेगावातील असलेले पद्मसिंह थापा (वय ७५) हे गेल्या ४५ वर्षांपासून जेजुरी व व्यापारीपेठेमध्ये रात्रीची गस्त घालण्याचे काम करतात. रात्रीच्या गस्तीतून आणि सलामीतून व्यापारी ग्रामस्थ यांनी दिलेल्या बक्षिसीतूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ‘साथी’ या नावाने त्यांना सारे ओळखतात. ११ वर्षांपूर्वी रात्रीच्या सुमारास गस्त घालताना त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. साडीच्या एका फडक्यामध्ये गुंडाळलेले चार-पाच महिन्यांचे बाळ रडत होते. बाळाच्या अवती भोवती भटके प्राणी होते. भटक्या प्राण्यांना हुसकावत थापा यांनी ती मुलगी उचलून घेतली. बसस्थानकाच्या बाजूचे व्यावसायिक गोळा करून थापा यांनी ही मुलगी कोणाची आहे? असे विचारले. काही वेळापूर्वी बसस्थानकाच्या आवारात या बाळासह एका महिलेला काही जणांनी पाहिल्याचे समजले. थापा यांनी पोलीस ठाणे गाठले. बेवारस स्थितीमध्ये मुलीला सोडलेल्या मातेचा पोलिसांनी त्यावेळी शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. पद्मसिंह थापा यांनी पोलिसांच्या परवानगीने मुलीला आपल्या घरी आणले आणि पत्नीच्या हवाली केले. त्यानंतर तीन ते चार दिवस बाळाच्या मातेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तपास लागला नाही. दरम्यान थापा आणि त्यांच्या पत्नीला बाळाचा लळा लागला होता.जोपर्यंत तिची माता मिळत नाही तोपर्यंत बाळ सांभाळायचे, असा निर्णय दोघांनी घेतला. या मुलीचे नाव ‘आशा’ असे ठेवले. मुडदूस या आजाराने बळावलेल्या या बाळाच्या उपचारासाठी बराचसा पैसा दोघांनी खर्च केला. मुलगी एक वर्षाची असताना थापा यांच्या पत्नीचे निधन झाले. थापा यांनी मात्र मुलीचा सांभाळ करण्याचे व्रत सोडले नाही. मुलीला शाळेत घालताना पिता म्हणून आपले नाव दिले. सध्या ही मुलगी शहरातील कन्याशाळेमध्ये ५ व्या इयत्तेमध्ये शिक्षण घेत आहे. सांभाळ केलेल्या आपल्या पित्याला ती ‘दादा’ संबोधते तेच तिच्यासाठी सर्वस्व आणि आई-वडील आहेत.जीवात जीव असेपर्यंत मुलीला सांभाळणारअजूनही थापा रात्रीची गस्त घालतात आणि त्यातून आपला व आपल्या मुलीचा उदरनिर्वाह चालवतात. परंतु सध्या वयोमानानुसार जास्त फिरणे होत नाही. पूर्वीच्या काळी माणुसकी होती, लोक आदर करीत बक्षिसी द्यायचे आणि महागाईसुद्धा नव्हती. आताच्या महागाईच्या काळात घरभाडे १ हजारांच्या वर भरावे लागते आणि पूर्वीसारखे लोक पैसे देत नाहीत. मुलगी सापडली त्यावेळी ‘पुण्य लागेल, तुम्ही मुलीला सांभाळा’ असे म्हणत सहानुभूती दाखवणारे आता मदतीचा हात देत नाहीत, ही खंत त्यांनी व्यक्त केली.जीवात जीव असेपर्यंत मुलीला चांगले शिक्षण देऊन तिच्या पायावर उभी करणार असल्याचे पद्मसिंह थापा यांनी सांगितले.