ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 6 - मातृत्वाला काळिमा फासणारी आणखी एक घटना वसईत उघडकीस आली आहे. एका मातेने आपल्या ८ दिवसांच्या तान्हुलीला वसई बस डेपोत उभ्या असलेल्या एका रिक्षात सोडून पळ काढला आहे. ही चिमुकली स्थिर असून तिची शिशुगृहात रवानगी करण्यात आली असून माणिकपूर पोलीस या मातेचा शोध घेत आहे.वसईत राहणारे सुनिल भील हे रिक्षाचालक वसईत रिक्षा चालवतात. रविवारी संध्याकाळी ते आपली रिक्षा वसई बस डेपोजवळ उभी करून रेल्वे स्थानकावर काही कामा निमित्त गेले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना रिक्षाच्या मागच्या सीटवर कापडात गुंडाळलेले तान्हुले बाळ आढळले. ही चिमुकली अवघ्या ८ दिवसांची आहे. भील यांनी परिसरात तपास केला असता एक महिला रिक्षाजवळ येऊन बाळाला सोडून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनीं सांगितले. भील यांनी महिलेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला परंतु ती रेल्वे स्थानकातून पळून गेली होती. याबाबत माणिकपूर पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू आहे.याबाबत माहिती देताना माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील यांनी सांगितले की, आम्ही रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटीव्ही तपासत आहोत. तसेच परिसरातील सर्व मॅटर्निटी होम्स मध्ये जाऊन शोध घेतला आहे. बाळाला टाकून जाणारी महिला बाहेरून आली असावी अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. या तान्हुलीला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. आता तिला नवी मुंबई येथील शिशुगृहात ठेवण्यात आले आहे. रिक्षाचालक तसेच एका महिला पोलिसाने या तान्हु्लीला सांभाळण्याची तयारी दर्शवली होती. ..वसईच्या फलाटावरील तान्हुल्याचेही गूढ कायमदोन महिन्यांपूर्वी वसईच्या फलाट क्रमांक ८ वर एका जोडप्याने एका तान्हुलीला सोडले होते. सीसीटीव्हीत ते जोडपे दिसत होते. अद्याप त्या जोडप्यांचा शोध लागलेला नाही.