ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. १४- जामखेड तालुक्यातील झिक्री येथील महिलेने आपल्या चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नातेवाईकांच्या मदतीने वेश्या व्यवसायासाठी गुजरात राज्यात तीस हजारात विकल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी जामखेड पोलिसात सोमवारी सायंकाळी दिली. त्यावरून पोलिसांनी मुलीच्या आईसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात प्रभू तुकाराम गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. पत्नी व तीन मुली व एक मुलगा यासह फिर्यादी गायकवाड झिक्री गावात राहतात. त्यांची पत्नी तीन मुली व एक मुलगा यांच्यासह माहेरी तेलंगसी (ता. जामखेड) येथे जाते म्हणून झिक्री येथे गेले. पंधरा दिवसानंतर दोन मुली व एक मुलगा यांना घेऊन पत्नी आली. त्यावेळी पती प्रभू गायकवाड याने थोरली चौदा वर्षांची मुलगी कोठे आहे?, असे विचारले असता माहेरी असल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळले. पत्नी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून पतीने नातेवाईकांकडे चौकशी केली. त्यावर तिने मुलीचे लग्न लावून दिल्याचे समजले.
पतीला पत्नीचा संशय आल्याने त्याने पत्नीला पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलिसांनी चौकशी केली असता तिने अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी विकल्याची माहिती उघड झाली. त्यानुसार प्रभू गायकवाड यांनी आपल्या पत्नीविरुद्ध तशी फिर्याद दाखल केली. सोमवारी रात्री या मुलीच्या शोधासाठी जामखेड पोलिसांचे एक पथक पुणे जिल्ह्यातील शिरूरला रवाना झाले.