ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - मातृभाषेतून शिक्षण ही सध्या जगभरात सुरू असलेली चलवळ असल्याचे सांगताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला. लोकमत माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘शिक्षण संवाद’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. आज शनिवारी सकाळी ११ वाजता पुण्यातील हॉटेल वेस्टइनमध्ये हे चर्चासत्र झाले. शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संस्थापकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून राज्याचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी यावेळी निर्माण करण्यात आली. या कार्यक्रमात व्यक्त झालेले मान्यवरांचे महत्त्वाचे विचार पुढीलप्रमाणे:
- दहावीत कुणीही नापास होणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. तरीही नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आणि या मुलांना एक वर्षाचे कौशल्याधारीत शिक्षण देणार. हे एका वर्षाचे शिक्षण झाले की त्याला दहावी उत्तीर्ण असं प्रमाणपत्र मिळेल. - विनोद तावडे
- स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा तसेच शिक्षण कृतीशील असावे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. - विनोद तावडे
- सर्वसमावेशक शिक्षणप्रणालीला सीबीएसई किंवा आयसीएसई मंडळं ही अडथळे आहेत असं मला वाटत नाही. - तावडे
- प्रत्येक बालकामध्ये जिज्ञासू वृत्ती असते, त्यामुळे त्याला घोकंमपट्टी करायला न लावता ज्ञान देण्याची गरज आहे. - माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा.
- ज्यावेळी विद्यार्थी शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडेल त्यावेळी आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन व्यावहारिक असायला हवा - राजेंद्र दर्डा
- मध्ये पगाराव्यतिरिक्त 313 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. - राजेंद्र दर्डा यांनी दिली माहिती.
- ग्रामीण व शहरी भागात शिक्षणाचे अनेक प्रश्न असून त्यावर काम करण्याची गरज आहे तसेच सर्वाना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. - राजेंद्र दर्डा.
- विद्यापीठं व सरकार यांच्यामध्ये चांगला समन्वय असावा यासाठी शीर्षक संस्था असावी अशी सूचना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू पंडीत विद्यासागर यांनी केली.
- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शालेमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग असावेत अशी सूचना एका तज्ज्ञाने व्यक्त केली.
- औद्योगिक क्षेत्राची मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार शैक्षणिक क्षेत्राची मांडणी व्हायला हवी अशी अपेक्षा अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी व्यक्त केली.
- शैक्षणिक अभ्यासक्रम व शैक्षणिक धोरण आखताना FDI व Make In India यांनाही डोळ्यासमोर ठेवावं - डॉ. एकनाथ खेडकर
- लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा आणि समूह संपादक दिनकर रायकर मान्यवरांसह व्यासपीठावर असून तज्ज्ञांचे विचार ऐकण्यास निमंत्रितांची उपस्थिती.
- सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री. मालदार यांनी दर्जेदार शिक्षणावर भर दिला.
- तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पठाण यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याची अपेक्षा व्यक्त केली.