आई कुणा म्हणू मी...? अल्पवयीन मुलीचे पालकत्व स्वीकारण्यास मातेचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 07:56 AM2023-02-26T07:56:59+5:302023-02-26T07:57:19+5:30

आजी-आजोबा झाले पालक

Mother, who should I say...? Mother's refusal to accept guardianship of minor daughter | आई कुणा म्हणू मी...? अल्पवयीन मुलीचे पालकत्व स्वीकारण्यास मातेचा नकार

आई कुणा म्हणू मी...? अल्पवयीन मुलीचे पालकत्व स्वीकारण्यास मातेचा नकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : आई ही मुलांचे सर्वस्व असते. त्यांचे संगोपन, पालनपोषण करणे, संस्कार घडविणे ही निसर्गत: जबाबदारी आईवरच असते. ठरावीक वयापर्यंत मुलांना आईचाच आधार अधिक जवळचा वाटतो. मात्र, याच आईने कठीण काळात मुलांचा हात सोडला तर ते सैरभैर होतात. असाच प्रसंग आलाय एका अल्पवयीन मुलीवर. जन्मदाता देवाघरी गेलेला, जन्म दिलेल्या आईने दुसऱ्याशी संसार थाटलेला अशा स्थितीत आईनेच मुलीचे पालकत्व स्वीकारण्यास नकार दिला. सरतेशेवटी आजी-आजोबांनाच तिचे पालक व्हावे लागले आहे. 

ही कथा आहे एका अल्पवयीन मुलीची. याचिकादार आजी-आजोबांच्या मुलाचा विवाह प्रतिवादीशी (मुलीची आई) २०११ मध्ये झाला. त्यांच्या संसारवेलीवर कन्यारूपी पुष्प उमलले. मात्र, दोघांमधील वाद टोकाला गेला. २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मुलीच्या दुर्दैवाचे फेरे इथेच संपले नाहीत. जन्मदात्याचा कोरोनामुळे २०२० मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईने पुनर्विवाह केला. तिच्या दुसऱ्या संसारात ती रमली. तिला दोन मुलेही झाली. मुलगा नाही, सुनेने दुसरा मार्ग निवडल्याने आपल्या अल्पवयीन नातीचे पालकत्व मिळावे, यासाठी तिच्या आजी-आजोबांनी उच्च न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठासमोर झाली. ही याचिका विचित्र परिस्थितीत दाखल झाली आहे, असे म्हणत न्यायालयाने अल्पवयीन मुलीचे पालक म्हणून तिच्या आजी-आजोबांची नियुक्ती केली.

आई म्हणाली...
दुसऱ्या विवाहापासून दोन मुले झाल्याने आता आपण मुलीची काळजी घेऊ शकत नाही. मुलीच्या आजी-आजोबांना तिचे पालक म्हणून नियुक्त करण्यास आपली काहीच हरकत नाही. मुलीच्या आईने आजी-आजोबांना अल्पवयीन मुलीचे पालकत्व देण्यास ना-हरकत दिल्याने तेच मुलीच्या हिताचे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने अखेरीस नोंदवले.

Web Title: Mother, who should I say...? Mother's refusal to accept guardianship of minor daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.