मुंबई : चिक्की घोटाळ््याबाबत प्रसिद्धी माध्यमात वरचेवर बातम्या येऊ लागल्या तेव्हा ‘आई, तूही भ्रष्ट राजकारणी (करप्ट पॉलिटीशियन) झालीस का,’ असा प्रश्न माझ्या मुलाने विचारल्याने मी कमालीची अस्वस्थ झाले. सारे काही समजून सांगितल्यानंतर त्याचे समाधान झाले. मात्र अशा आरोपांचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो त्याची माझ्यातील आईला जाणीव झाली, असे भावनिक उदगार महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना काढले.मुलाने मला हा प्रश्न केल्यावर मी त्याला रेट कॉन्ट्रॅक्ट, ई-टेंडरिंग वगैरे बाबी माझ्यापरीने समजून सांगितल्या. मला माझ्या आईनेही तू नीट अभ्यास न करता घाईगर्दीत निर्णय घेतला का, असे विचारले. प्रत्येक आईला आपले मूल कायम लहान वाटते. तिलाही मी माझा निर्णय समजून सांगितला. त्यानंतर माझे कुटुंबीय माझ्या पाठीशी उभे राहिले व मला लढण्याचे मानसिक बळ लाभले, असे पंकजा म्हणाल्या.गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेते असताना शरद पवार यांच्यावर केलेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या आरोपांशी चिक्की घोटाळ््याबाबत केलेल्या वैयक्तिक आरोपांची तुलना करू नका. मुंडे यांच्या आरोपांकरिता त्यांच्याकडे सबळ पुरावे होते. शिवाय हे आरोप करून सत्तेवर आल्यावरही त्यांची राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधातील लढाई सुरू राहिली होती. त्यामुळे कृपया या दोन गोष्टींची तुलना करू नका, असे त्या म्हणाल्या. मागील सरकारने जलयुक्त शिवार योजनेत बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याची कामे असमाधानकारक असल्याच्या तक्रारी असल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मुंडे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
आई, तूही भ्रष्ट राजकारणी ?
By admin | Published: July 09, 2015 2:11 AM