मुंबई - आई फक्त आपल्याला जन्मच देत नाही तर आपल्याला घडवते आणि एक चांगली व्यक्ती बनवते. आज 'मदर्स डे'... आईबाबतच्या आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा खास दिवस. खरं तर आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी विशेष दिवसाची गरज नाही. पण प्रेम व्यक्त करण्यासाठी एक कारण म्हणून या दिवसाकडे नक्कीच पाहिलं जातं. आज मातृ दिवस असल्याने अनेक नेते आणि कलाकार मंडळींनी आईसोबतचे काही सुंदर फोटो शेअर करत आठवणी जागवल्या आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही मातृदिनाच्या निमित्ताने आईसाठी एक खास गोष्ट केली आहे. रोहित पवार यांनी स्वयंपाक घरात आईच्या आवडीचा 'आल्याचा चहा' बनवला आहे. रोहित यांनी केलेला चहा त्यांच्या आईला ही फारच आवडला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी आजचे काही खास फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. 'मातृ दिनाच्या निमित्ताने आजीने दिलेल्या भांड्यात आईच्याच मदतीने आज आईसाठी आल्याचा चहा बनवला. चहा साधारणच बनला होता पण खूप सुंदर झाला असा आईचा प्रतिसाद होता. चहा खरंच सुंदर झाला होता की मुलाने बनवला म्हणून सुंदर लागला ते आईलाच माहीत. पण यावरुन कळतं आई काय असते ते!' असं रोहित यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरूनही मातृदिनाच्या निमित्ताने पोस्ट केली आहे. 'दररोज आई आपल्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवते म्हणून आज मातृ दिनाच्या निमित्ताने आईच्या आवडीचं काहीतरी तयार करायचं ठरवलं. खाण्या-पिण्याबाबत आईची वेगळी अशी खास आवड नाही पण असेल ते आवडीने खायची सवय. पण तरीही थोडा विचार केला आणि सर्वांत सोपं म्हणून चहा बनवायला किचनमध्ये गेलो. पण तिथेही मला आईची मदत घ्यावीच लागली. आईसाठी नेहमी ज्या भांड्यात चहा तयार केला जातो त्या आजीने दिलेल्या भांड्यात आल्याचा चहा तयार केला आणि भरलेला कप आईच्या हाती दिला. चहा चवीला साधारणच बनला होता पण 'खूप सुंदर झाला' असा आईचा प्रतिसाद होता. चहा खरंच सुंदर झाला होता की मुलाने बनवला म्हणून सुंदर लागला ते आईलाच माहीत. पण यावरुन कळतं आई काय असते ते! #मातृदिवस'' असं रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या जयंत पाटलांनीही मातृदिनाच्या निमित्तानं आईंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी आईच्या आठवणींना वाट मोकळी करून दिली आहे. ते लिहितात, आज वर्ल्ड मदर्स डे आहे. तशी रोजच आईची आठवण येते, मात्र आजचा दिवस स्पेशल आहे म्हणून आपल्याशी आईच्या काही आठवणी शेअर करतोय...
आईचं शिक्षण जेमतेम 7 वीपर्यंत होतं, मात्र तिचं ज्ञान भल्याभल्या पंडितांना लाजवेल, असं होतं. आम्हा भावंडांमध्ये मी सर्वात लहान. मला खेळायची खूप आवड होती. मग कधी कोपर फोड, कधी ढोपर फोड असं सुरूच असायचं. पण आई प्रचंड शिस्तप्रिय होती म्हणून खेळासह ती माझ्याकडून अभ्यासही करून घ्यायची. आईच्या संस्कारामुळेच आम्हाला शिक्षणाची गोडी लागली. आईची आवडती गोष्ट म्हणजे भाजीमंडईत जाऊन भाजी खरेदी करणे. आईचा लाडका असल्यामुळे मीही आईसोबत तिच्या मागे मागे मंडईत जायचो. २५ पैशांची भाजी आई १५ पैशात घेते हे पाहून मला भलतं कुतूहल वाटायचं. मी त्या गोष्टीचे बारीक निरीक्षण करायचो. कदाचित राज्याचा आर्थिक भार सांभाळत असताना हाच अभ्यास मला कामाला आला असावा. खरंतर तिची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी एक नवीन धडा असायची. संकटाच्या काळात आई नेहमीच माझं प्रेरणास्थान राहिली आहे. बापूंनी स्वतःला समाजकारणात झोकून दिले असताना आईने त्यांच्या संसाराचा डोलारा अगदी व्यवस्थित उभा केला. प्रत्येकाला आपुलकीने विचारयाची आणि मायेनं जवळ घ्यायची तिची सवय आजही आठवते. मदर्स डे निमित्त माझ्या आईला भरपूर प्रेम आणि या भूमीवरील प्रत्येक मातेला वंदन, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचे थैमान! ग्रीन झोन होत आहेत रेड झोन?; 'या' जिल्ह्यांत नवे रुग्ण
CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू
CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर
CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता
CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी
CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका