अतुल चिंचली/प्रिती जाधव पुणे : घरगुती बाळंतपण होण्याचे दिवस केव्हाच संपले. आता बहुतांश बाळांचा जन्म रुग्णालयांमध्येच होतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या संगोपनासाठी आई तयार होईपर्यंत रुग्णालयातल्या ‘आया’ बाळाची काळजी घेतात. स्त्री गर्भवती असल्यापासूनच ‘आया’ त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतात. जागतिक मातृदिवसाच्या निमित्ताने आईची आठवण प्रत्येकाला होते. मात्र जन्मानंतरच्या नाजुक दिवसांमध्ये साथ देणारी ‘आया’ बहुतेकांच्या स्मरणातदेखील नसते. रुग्णालयात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचा सांभाळ स्वत:चे बाळ असल्याच्या काळजीतून करणाऱ्या ‘आया’ पुण्यातल्या सर्व प्रसुतीगृहांमध्ये आहेत. जणू दुसरी आईच. प्रसुतीनंतर पुढील काही दिवस जन्मदात्या आईच्या हालचालींवर मर्यादा असतात. प्रसुती नैसर्गिक झालेली नसेल तर विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी बाळाची सर्वोतोपरी काळजी घेण्याचे काम आया करतात. प्रसुतीगृहांमध्ये दोन प्रकारच्या आया कार्यरत आहेत. गरोदर अवस्थेत असताना प्रसूती होईपर्यंत आईला डॉक्टरांच्या आणि आयांच्या निगराणीखाली ठेवले जाते. या कालावधीत बाळ पोटात असताना गर्भवतीची काळजी घेण्याचे काम आया करतात. गर्भवतीचा आहार, औषधोपचार, स्वच्छता, वैद्यकीय गरजा यावर आया लक्ष ठेवून असतात. दुसऱ्या प्रकारच्या आया जन्मलेल्या बाळांचा सांभाळ करतात. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची स्वच्छता करुन त्याला स्वच्छ कापडात ठेवून आईकडे सुपूर्त केले जाते. या क्षणापासून आयांचे काम सुरू होते. बाळाच्या स्वच्छतेपासून, आंघोळ, दूध पाजण्याची वेळ, या सर्वांकडे एका आईप्रमाणे लक्ष देतात. आया एकाच बाळाचा सांभाळ करत नाहीत. एका आयाला दिवसातून नऊ ते दहा बाळांचा सांभाळ करावा लागतो. या दिवसातून तीन शिपमधून काम करतात. रुग्णालयात बारा तास कार्यरत असतात. आयांना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही. नवीन आलेल्या आयांना जुन्या आया काम शिकवतात.
.............जिथे कमी तिथे ‘आया’बाळाला आणि आईला सांभाळणे हे आयांचे मुख्य काम आहे. परंतु रुग्णालयातील स्वछता, नर्सची कामे, डॉक्टरांना मदत करणे अशा ऐनवेळच्या अनेक कामांना आयांना हातभार लावावा लागतो.
पाचशेपेक्षा जास्त बाळांचे संगोपनमी गेली २२ वर्षे हे काम करत आहे. बाळांच्या संगोपनाबरोबरच रुग्णालयाची देखभाल आम्ही करतो. आतापर्यंत पाचशे ते सहाशे बाळांचे संगोपन केले आहे. आईच्या भावनेनेच आम्ही हे काम करतो. -अनिता लोहोट पोटच्या मुलासारखे जपतोतीस वर्षात वेगवेगळ्या रुग्णालयात काम केले आहे. बºयाच ठिकाणी चांगले, वाईट, कडु-गोड अनुभव आले. आम्ही सर्व आया एकमेकांना सहकार्य करत असतो. आईला व बाळाला काही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सतत काळजी घेतो. या बाळांचे संगोपन आम्ही स्वत:च्या मुलाप्रमाणे करतो. -मीना शळकंदे
प्रमोशन आणि संरक्षण हवेगेली ९ वर्षे मी रुग्णालयात आया म्हणून काम पाहत आहे. आमच्या सारख्या गरजू महिलांना आधूनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. ज्येष्ठतेनुसार प्रमोशन करावे. परिचारिका आणि आया कार्यरत असताना संरक्षण द्यावे. शासकीय सर्व परिचारीकांसमवेत आयांची भरती करावी. -अनिता गवंडे
----(समाप्त)-----