अय्युब शेख
माढा : शहरातील गोरगरीब निराधारांना दोनवेळचे जेवण देण्याचे कार्य गेल्या दोन वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. १ आॅगस्ट २०१९ रोजी मातोश्री शकुंतला सूर्यभान गायकवाड यांचे सकाळी ९ वाजता निधन झाले, तरीही ११़३० वाजता निराधारांना घरपोच जेवण दिलेच़ अशी निराधारांची अविरत सेवा करण्याच्या अन्नदात्याचे नाव आहे मधुसूदन गायकवाड.
माढा शहरात अंध-अपंग निराधारांना पोटभर जेवण मिळावे, अशी भावना निर्माण झाली़ त्यानंतर शहरात असे किती निराधार आहेत़ अन्नावाचून त्यांचे खरोखरच हाल होतात का याची पाहणी केली़ त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून दोनवेळचे जेवण या निराधारांच्या घरी पोहोच करण्याचा उपक्रम अविरतपणे सुरू केला आहे़ विशेष म्हणजे आठवडाभर जेवणात रोज भाकरी, चपाती, दोन भाज्या, भात यांचा समावेश असतो़ त्याचे वेळापत्रकही तयार केले आहे. एकादशीला खिचडी, भगर दिली जाते. सणासुदीला पुरणपोळीचे जेवण दिले जाते़ दिवाळीमध्ये लाडू, चिवडा, करंजी, शंकरपाळी आदी दिवाळीचा फराळ दिला जातो.
सकाळी जेवणाचा डबा देताना रात्री दिल्याचा रिकामा डबा परत घेतला जातो़ डबा घेताना त्यांना विचारले जाते, पोटभर जेवण होते का की अजून चपाती, भाकरी किंवा भाजी वाढवून द्यावी, याची विचारपूस केली जाते़ शिवाय त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली जाते़ हे पोटभर जेवण झाल्यानंतर हे ते निराधार मनापासून आशीर्वाद देताता़ तोच आपल्याचा खरा आशीर्वाद असतो, असे मधुसूदन गायकवाड सांगत होते.
आपण समाजाकडून काहीतरी घेतो़ ते परत करण्याची क्षमता आपल्यात असावी़ म्हणून हा उपक्रम आहे़ तहानलेल्या पाणी देणे, भुकेलेल्यांना अन्न देणे हे पुण्य कार्य आहे़ आईचे निधन झाल्यानंतरही या निराधारांना जेवण पोहोच करुनच आईवर अंत्यसंस्कार केले़ तीच खरी आईला श्रद्धांजली असेल़ याचे मलाही समाधान वाटले़- मधुसूदन गायकवाड,अन्नदाता