पुणे : एका मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचा फलक लावण्यासाठी लाकडी पहाड बांधत असताना विजेचा धक्का बसल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेचा धक्का बसल्यामुळे कामगाराच्या आईचाही सोमवारी सकाळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वारज्यामध्ये घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भारत सखाराम कदम (वय ३०, रा. पॉप्युलरनगर, वारजे) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम एका मंडप ठेकेदाराकडे काम करीत होता. त्याचे लग्न झालेले असून, त्याला तीन मुले आहेत. त्याची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. वारज्यातील पॉप्युलरनगरमधील एका मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीची माहिती देणारा फलक लावण्याचे काम मंडप ठेकेदाराला दिले होते. रविवारी संध्याकाळी लाकडी बांबूचा पहाड बांधत असताना कदम यांचा हात शेजारच्या विजेच्या खांबावरील तारेला लागला. फलक लावण्यासाठी तसेच पहाड बांधण्यासाठी मनपाची परवानगी घेण्यात आली होती का तसेच मंडप ठेकेदार कोण, याची माहिती घेण्यात येत आहे. नातेवाइकांचे जबाब घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अनुजा देशमाने यांनी दिली. दरम्यान, वारजे पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचा मृत्यू
By admin | Published: September 13, 2016 1:41 AM