वाशिम: ग्रामीण व शहरी भागात सुरक्षित प्रसुतीला प्रोत्साहन देणे तसेच माता व अर्भक मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. २00९ ते मार्च २0१४ या पाच वर्षांमध्ये डॉक्टरांच्या निगराणीत १७.१२ लाख महिलांच्या प्रसुती झाल्या असून, मृत्यूचे प्रमाण १0४ वरून ८0 पर्यंत घसरले असल्याची साक्ष आरोग्य सेवा संचालनालयाची आकडेवारी देत आहे.आदिवासी, दुर्गम भागातील तसेच गोरगरीब महिलांची प्रसुती डॉक्टरांच्या निगराणीत किंवा दवाखान्यात होत नसल्याने माता व अर्भक मृत्यूदर कमी करणे, हे आरोग्य विभागासमोर आव्हानच ठरले होते. यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने जननी सुरक्षा योजना सुरू केली. दारिद्रय़रेषेखालील तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या कुटुंबातील १९ वर्षावरील मातांचा मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर कमी करणे हा मुख्य उद्देश या योजनेमागे आहे. दवाखान्यात प्रसुती होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी लाभार्थी महिलेस अनुदानही दिले जाते. या योजनेंतर्गत संस्थेमधील प्रसुतीनंतर सात दिवसाच्या आत ग्रामीण भागातील लाभार्थीस ७00 रुपये आणि शहरी भागातील लाभार्थीस ६00 रुपये दिले जाते. कुशल दाईच्या मदतीने घरी प्रसूत होणार्या ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थीस ५00 रुपये दिले जातात. शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती झालेल्या लाभार्थीस १५00 रुपये दिले जातात. २00९-१0 या आर्थिक वर्षात राज्यभरातील तीन लाख ४८ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यासाठी राज्य शासनाने २७ कोटी ४१ लाख रुपयांच्या खर्चाचा बोजा सहन केला. २0११-१२ मध्ये सर्वाधिक, अर्थात चार लाख पाच हजार महिलांची प्रसुती दवाखाना किंवा दाईच्या निगराणीत झाली असून, अनुदानापोटी राज्य शासनाने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले आहेत. २0१३-१४ या आर्थिक वर्षात राज्यभरातील दोन लाख ४१ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यावर राज्य शासनाने २८ कोटी ६६ लाख रुपये खर्च केले आहेत. या योजनेचा चांगले परिणाम दिसून माता मृत्यूदर खाली आला आहे. राज्यात २00७-0८ मध्ये माता मृत्यूदर प्रत्येक हजार प्रसुतींमागे १0४ होते. २0११-१२ मध्ये ते ८७ पर्यंत घसरले. २0१२-१३ मध्ये हेच प्रमाण ८0 पर्यंत घसरले.
जननी सुरक्षेचे कवच अडीच लाख मातांना
By admin | Published: August 10, 2014 11:27 PM