पुणे : कथाकथन ऐकावे तर ते साहित्यिक द. मा. मिरासदारांच्या वाणीतून, असे म्हटले जाते. बुधवारी रसिकांच्या आयुष्यात हा योग जुळून आला तोही त्यांच्याच अभीष्टचिंतनानिमित्त! अवघे ८८ वर्षे इतुकेच वय असलेल्या द.मां.नी कथाकथनाला सुरुवात करताच त्यांच्या या कथेतील पात्रात रसिक रंगून गेले. कधी विद्यार्थी, कधी स्मरणशक्तीचे प्राध्यापक, कधी सुभद्रा आणि त्यांची मराठी. विनोदी आणि खुमासदार शैलीत सादर केलेल्या कथाकथनावर ‘मिरासदारी’ हुकुमत कायम आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा रसिकांना आली. मेहता पब्लिकेशन हाऊसच्या वतीने द.मां.च्या ८८व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कथाकथन, संवाद आणि अभीष्टचिंतन अशा अनोख्या कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. अनिल मेहता उपस्थित होते. या वेळी त्यांनी चिं.वि. जोशींची ‘स्मरणशक्तीचे प्रोफेसर’ ही कथा खास त्यांच्या शैलीत बहरत नेली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर द.मां.चे कथाकथन ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली.कथेला सुरुवात करण्यापूर्वी द.मा म्हणाले, ‘चिं.वि हे एक उत्तम विनोदी लेखक होते. त्यांच्याकडून मी शिकलो. त्यांचे वाङ्मयीन ऋण म्हणून मी आज त्यांची कथा सादर करणार आहे. पूर्वी व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांच्याबरोबर मी कथाकथनाचे अनेक प्रयोग केले आहेत. तेव्हा लोक मला विचारतात कथाकथन कसं करायचं किंवा उत्तम साहित्य कसं लिहायचं? पण हे काही शिकवून सांगून येत नाही; ते उपजत असावं लागतं किंवा एकलव्यासारखं शिकावं तरी लागतं.चिं. वि. जोशींना संमेलनाध्यक्षपद मिळाले नाही हे दुर्दैव. ज्येष्ठ विनोदी लेखक चिं. वि. जोशी हे एक उत्तम लेखक होते. त्यांच्या कथा ऐकून, वाचून मी शिकलो. पण त्यांचे वक्तृत्व फारसे प्रभावशाली नव्हते. त्यामुळे सार्वजनिक जीवनात त्यांना यश मिळू शकले नाही. पात्रता असूनही त्यांना साहित्य संमेलनाध्यक्षपद मिळाले नाही, हे दुर्दैव आहे.- द. मा. मिरासदारमराठीत बोला, मातृभाषेची सेवा करामराठी भाषेच्या विकासासाठी केवळ साहित्यिक एकत्रित येऊन संमेलनच भरवण्याची गरज नाही. त्याहीपेक्षा प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर मराठीत जरी बोलले किंवा भाषेचा आग्रह धरला तरी मातृभाषेची सेवा होईल, असे द.मा. म्हणाले. तसेच मराठीला कमी न लेखता भाषेबद्दल इतरांच्या मनात प्रेमही निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले.
द. मां.च्या कथाकथनाची ‘मिरासदारी’
By admin | Published: April 16, 2015 1:02 AM