- लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने वाटणीची संपत्ती देत नसल्याने वृद्ध आईचा सुरीने गळा चिरला. एवढ्यावर न थांबता पोट, छाती, कमरेवर असे आठ वार केले. ज्योती अमरसिंह माने (वय ७५) असे या मातेचे नाव असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले.ही घटना आर. के. नगर येथे सोमवारी सकाळी ११च्या सुमारास घडली. या प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित मुलगा पृथ्वीराज माने (वय ४७) याला अटक केली असून, त्याच्याकडून रक्ताने माखलेला सुरा ताब्यात घेतला.अमरसिंह मारुती माने (वय ८०) हे वरिष्ठ अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. पत्नी व दोन मुलांसह ते आर.के. नगर येथील द्वारकानंद कॉलनीतील दुमजली बंगल्यात राहतात. माने यांना पृथ्वीराज (वय ४७) व देवेंद्र (४०)अशी दोन मुले आहेत. पृथ्वीराज विवाहित असून, त्याला दोन मुली आहेत. देवेंद्र अविवाहित आहे. माने यांनी पृथ्वीराजला विविध कंपन्यांच्या एजन्सी घेऊन दिल्या. मात्र त्याने सर्व व्यवसाय मातीमोल केले. त्यानंतर घरात सुरू केलेले दुकानही बंद पाडले. उद्योग-व्यवसाय नसल्याने खर्चाला पैसे नव्हते. त्याने वडिलांकडे सतत पैशाची मागणी, संपत्तीची वाटणी करून देण्यासाठी तगादा लावला होता. त्यातून त्यांच्यात वादावादी होत होती. सकाळीही बाप-लेकात जोरदार वादावादी झाली. वडील अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर पृथ्वीराज हातात सुरा घेऊन खाली आला. आईचे तोंड दाबून धरून सुरीने गळा चिरला. त्यानंतर पोट, छाती, कमरेवर सपासप आठ वार केले. त्यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून वडील पळत बाहेर आले. तोपर्यंत पृथ्वीराज पसार झाला होता. माने यांनी पत्नीला मोटारीमधून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर)े दाखल केले. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांचा राग आईवर काढला वडिलांसोबत रोज वाद होत असे. संपत्तीतील वाटा देण्यास विरोध करणाऱ्या वडिलांचा खूप राग आला होता. त्यांना संपविण्यासाठी वरती खोलीत गेलो. सुरा घेऊन खाली आलो, तर समोर आई होती. प्रत्येकवेळी वादावादीवेळी ती वडिलांची बाजू घेऊन मला दोष देत होती. ती समोर दिसल्याने वडिलांचा राग आईवर काढल्याचे हल्लेखोर पृथ्वीराजने पोलिसांना सांगितले.