डोंबिवली: मध्य रेल्वेच्या सतर्क मोटरमनने वेळेवर केलेल्या कारवाईमुळे टिळक नगर - चेंबूर स्थानकांदरम्यान ट्रॅकवर पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचला. रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी २.१२ वाजता पनवेल करिता सुटलेल्या उपनगरीय रेल्वेगाडीमध्ये कर्तव्यावर असताना मोटरमन पी.के.रत्नाकर यांना टिळक नगर ते चेंबूर दरम्यान एक व्यक्ती रुळावर पडलेली आढळली.
टिळक नगर - चेंबूर विभागात न्यूट्रल सेक्शन मध्ये गाडी असल्यामुळे लोकल ट्रेनचा वेग कमी होता. त्यांनी तातडीने ब्रेक्स लावले आणि ट्रॅकवर असलेल्या व्यक्तीपासून अवघ्या १०-१२ मीटर अंतरावर ट्रेन थांबवली. ट्रेनमधील प्रवाशांनी त्या व्यक्तीला ट्रॅकवरून सुरक्षित ठिकाणी नेण्यास मोटरमनला मदत केली. मोटरमन पी. के. रत्नाकर यांच्या क्षणात घेतलेल्या निर्णयाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना टळली. त्यांनी केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. लोकल ट्रेनच्या गार्डकडूनही कंट्रोलला याची माहिती देण्यात आली. मोटरमनचा प्रसंगावधान आणि वेळेवर तसेच त्वरित केलेल्या कारवाईमुळे एकाचा जीव वाचला. त्यांना योग्य पुरस्कार देण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.