अकोला : हिमालयीन गिर्यारोहण हे एक अवघड साहस आहे. हे साहस करताना हिंमत, धैर्य आणि सोबतच आत्मविश्वास लागतो. या बळावरच अकोल्याच्या पूजा जंगमने माऊंट मेन्थोसा हे हिमालयीन शिखर सर केले. विशेष म्हणजे पूजा व तिच्या सहकार्यांनी सर्वात कमी वेळात ही मोहीम पूर्ण करून एक विक्रम स्थापित केला आहे. हा विक्रम करून पूजा सोमवारी अकोल्यात आली. त्यावेळी अजिंक्य साहसी संघाच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिने आपले अनुभव कथन केले. दिल्ली येथील इंडियन माऊंटरिंग फाऊंडेशन या इंडियन आर्मीच्या संचलनात चालविल्या जाणार्या संस्थेच्या माध्यमातून विविध गिर्यारोहण मोहिमांचे आयोजन करण्यात येते. या मोहिमेत देशभरातील गिर्यारोहक सहभागी होतात. यावर्षी या मोहिमेत अकोल्याची पूजा जंगम ही युवती सहभागी झाली होती. तिने समुद्रसपाटीपासून ६,४४३ मीटर उंच असलेल्या हिमालयातील माऊंट मेन्थो शिखर सर करण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे फक्त मुलींसाठीच असलेल्या या मोहिमेत पश्चिम भारतातून सहभागी झालेली पूजा ही एकमेव मुलगी आहे. एकूण ११ युवतींनी या मोहिमेत सहभाग घेतला. पूजाने हिमाचल प्रदेशातील हिमालयीन रागांमधील माऊंट मेन्थो शिखर सर करून गिर्यारोहणात आणखी एक पाऊल टाकले आहे.
अकोल्याच्या पूजाने गाठले माऊंट मेन्थोसा शिखर
By admin | Published: July 22, 2014 12:39 AM