शरद वाघमारे
मालेगाव (जि.नांदेड), दि. १६ - गिर्यारोहण हा छंद धाडसी माणसांचा असतो़ यात जिवाची पर्वा न करता हजारो फुटापर्यंतचे शिखर सरही करावे लागतात़ मालेगाव येथील शिक्षक ओमेश पांचाळ यांनी हिमालयातील २० हजार फुटांचे बर्फाच्छित माऊंट स्टोक कांगरी शिखर सर करण्याची जिगरबाज कामगिरी केली आहे़ या गिर्यारोहण मोहिमेचा चित्तथरारक अनुभव त्यांनी सांगितला़.
ओमेश शिवराम पांचाळ (रा़मालेगाव ता़अर्धापूर) येथील रहिवासी असून व्यवसायाने ते प्राथमिक शिक्षक आहेत़ अनेक दिवसांपासून त्यांना गिर्यारोहणाची आवड होती़ ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले़ २९ आॅगस्ट ते २४ सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत ते गिर्यारोहणासाठी आपल्या चमूसमवेत रवाना झाले़ सुरुवातीला त्यांनी सोनमर्ग येथील ‘हाय अल्टीट्युड वार फेअर’ या आर्मीच्या रॉक फेस ट्रेनिंग एरियामध्ये व थाजिवास ग्लेशीअर या ठिकाणी रॉक क्लायबिंग व आईस क्रॉफ्टची ट्रेनिंग घेवून जम्मू काश्मीरच्या लेह येथील आयटीबीटीच्या प्रशिक्षण केंद्रात सुमारिंग, पिच क्लायबिंग या बाबतचे चढाईचे तंत्र शिकले़ त्यानंतर त्यांनी शेवटी जम्मू काश्मीरमधील लेह, लदाख, झंस्कार या हिमालयीन पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर 'माऊंट स्टोक कांगरी' सर करण्यासाठी २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री म्हणजे १२ वाजता चढाई सुरू केली़ यावेळी तापमानही उणे सात ते उणे दहा अंश सेल्सिअस होते़ रात्री १२ वाजता शिखर चढाईला सुरू केल्यानंतर २० हजार १०० फुटांचे बर्फाच्छित माऊंट स्टोक कांगरी हे शिखर सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांत सर केले़ म्हणजेच एकूण आठ तासांत ओमेश पांचाळ यांनी ही कामगिरी केली़
या मोहिमेत त्यांच्यासोबत पुणे, मुंबई, नाशिक येथील गिर्यारोहक होते़ यावेळी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीही तणावपूर्ण होती़ प्रवास करताना त्यांना वेळोवेळी भारतीय सैन्याची मदत घ्यावी लागली़ भारतीय लष्कराने दहशतवाद्यांवर हल्ला केला, त्यावेळी ओमेश पांचाळ व त्यांचा चमू जम्मू काश्मीरमध्येच होता़ गिर्यारोहण करताना विशिष्ट असा आहार पोषक असावा लागतो़ कुटुंबियांचा कित्येक दिवस संपर्कही होत नाही़ ही एक प्रकारची लढाईच असते, थोडी जर चूक झाली तर व्यक्तीचा शेकडो फूट दरीत पडून मृत्यू होतो़ त्यांच्या गिर्यारोहणाचा जिगरबाज प्रवास ऐकताना अंगावर शहारे येत होते़ मी यापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर केले़ त्यानंतर नेपाळ येथील कांचनगंगा मोहीम झाल्यानंतर हिमालयातील माऊंट स्टोक कांगरी शिखर करण्यासाठी यशस्वी झालो़ आता या यशानंतर माझे ध्येय माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करायचे आहे. - ओमेश पांचाळ, गिर्यारोहक, मालेगाव़