पुणे : फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटमधील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत तोडगा निघावा म्हणून यापूर्वी प्रयत्न केला. मध्यंतरीच्या काळात या आंदोलनाला राजकीय वळण लागले. केंद्र सरकारने दोन पावले मागे घेतल्यास डोंगर कोसळणार नाही, असे मत नोंदवून भाजपाचे खासदार, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केंद्र सरकारला घरचा अहेर दिला.पुण्यात शुक्रवारी सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय लिटररी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास आले असता सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाला तीन महिने होत आले. सिन्हा म्हणाले, की या प्रश्नासंदर्भात विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधला नसतानाही एक ठोस भूमिका घेऊन केंद्र सरकारशी चर्चा केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. केजरीवाल य्यांनी दिल्लीत तात्पुरत्या स्वरूपात संस्था सुरू करण्याची तयारी त्यांनी दाखविली होती. कायमस्वरूपी संस्थाही सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. पण ती दीर्घकालीन प्रक्रिया असल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नसल्याचे ते म्हणाले. अध्यक्षपद स्वीकारण्यात माझी इच्छा नाही. (प्रतिनिधी)
केंद्र मागे हटल्यास डोंगर कोसळणार नाही
By admin | Published: September 06, 2015 2:14 AM