लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातील शाळांकडून होत असलेल्या मनमानीविरोधात ‘डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया’ (डीवायएफआय) १५ जूनला डोंबिवलीत पालकांना सोबत घेऊन आंदोलन करणार आहे. ‘लोकमत’मध्ये ७ जूनला ‘ठाणे, डोंबिवलीमध्ये शाळांची दुकानदारी’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. पालकांच्या मनातील प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली. काही पालकांनी अन्य शाळांमधून व खाजगी दुकानदारांकडून शालेय साहित्यविक्रीत मक्तेदारी केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याची दखल डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया या संघटनेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी घेतली आहे. याबाबत ते म्हणाले की, अनेक शाळांमधून शालेय साहित्याची विक्री केली जाते. विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हे प्रकार मोठ्या प्रमाणावर चालतात. या शाळांतूनच साहित्यखरेदीची सक्ती केली जाते. पालकांचे शाळा ऐकत नाहीत. त्याचा भुर्दंड नाहक पालकांना सहन करावा लागतो. बाजारात मिळणारी एखादी शालेय वस्तू शाळा दुप्पट दराने विकत आहेत.’अनेक शाळांना मैदाने नाहीत. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळण्याची संधी मिळत नाही. तसेच ‘राइट टू एज्युकेशन’नुसार अनेक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जात नाही. प्रवेश दिल्यावरही काही शाळा विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारतात. शैक्षणिक शुल्क ठरवण्याचा अधिकार शाळांना आहे. मात्र, अनेक शाळांच्या या शुल्कात तफावत आहे. शाळांकडून अरेरावी केली जाते. विद्यार्थ्यांनाशिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेतले पाहिजे, असे गायकवाड म्हणाले.>शिवाजी पुतळ्यासमोर करणार निदर्शनेकल्याण-डोंबिवलीत इंग्रजी माध्यमाच्या आयसीएसई, सीबीएसई या अभ्यासक्रमाच्या शाळा पालकांना वेठीस धरत आहेत. पाल्यास कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालक शाळांच्या मनमानीविरोधात कोणताही आवाज उठवत नाहीत.शाळांच्या मनमानीविरोधात जवळपास १०० ते १५० पालक १५ जूनला करण्यात येणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. हे आंदोलन डोंबिवली पूर्वेतील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सायंकाळी ५ वाजता केले जाईल. या आंदोलनाला स्टुंडट फेडरेशन आॅफ इंडिया ही संस्थादेखील साथ देणार आहे.
शाळांच्या मनमानीविरोधात १५ जूनला आंदोलन
By admin | Published: June 09, 2017 3:09 AM