मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमधील संघर्षाचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. दिल्ली विद्यापीठात झालेल्या गदारोळाचे लोण महाराष्ट्रातील विद्यापीठात पोहोचले आहे. कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनांच्या फुटीर धोरणांचा निषेध म्हणून अभाविपने शनिवारी मुंबई विद्यापीठात आॅल इंडिया स्टुडंट असोसिएशन (एआयएसए)च्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन केले. दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही डाव्या संघटनांकडून शैला रशीद आणि उमर खलील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणाबाजीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. दिल्ली विद्यापीठातील या फुटीरतावादी कार्यक्रमांना अभाविपने विरोध दर्शविला होता. कार्यक्रमस्थळी अभाविपच्या घोषणाबाजीनंतर दोन्ही विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. या प्रकारानंतर अभाविपने देशभर डाव्या संघटनांविरोधात मोर्चा उघडला आहे. शनिवारी दुपारी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अभाविप कार्यकर्त्यांनी एआयएसएचा निषेध म्हणून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. फुटीरतावादी एआयएसएच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून, पुढील टप्प्यात मुंबईतील सर्व महाविद्यालयांमध्ये आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अभाविपचे मुंबई सचिव रोहित चांदोडकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
अभाविपचे मुंबई विद्यापीठात आंदोलन
By admin | Published: February 26, 2017 1:59 AM