- राजू काळेभार्इंदर - गांधी जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने आ. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भार्इंदर फेरीवालामुक्त करण्यासाठी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. त्यांनी फेरीवाल्यांना गुलाब देऊन रस्त्यावर फेरीवाला व्यवसाय न करण्याचे आवाहन केले. यावर फेरीवाला संघटनांच्या पदाधिका-यांनी मात्र सेनेची ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केला.शहरात फेरीवाला उदंड झाल्याचे वृत्त लोकमतने अनेकदा प्रसिद्ध केले होते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्याने फेरीवाल्यांनी थेट वाहतुकीच्या रस्त्यांसह ना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्याने नागरिकांसह वाहतुकीला अडचणीचे ठरू लागले आहे. त्यातच मीरारोड रेल्वे पादचारी पुलावरच फेरीवाले बस्तान मांडून प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण निर्माण करीत आहेत. तर भार्इंदर पूर्व-पश्चिमेकडील उत्तर दिशेच्या पुलाजवळच फेरीवाले जागा अडवून प्रवाशांना अडचण निर्माण करीत आहेत. २९ सप्टेंबरला एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती भार्इंदर व मीरारोड रेल्वे पुलावर होऊ नये, यासाठी फेरीवाल्यांना आळा घालण्याची मागणी होऊ लागली आहे. पूर्ण शहर व रेल्वे परिसरच फेरीवालामुक्त करा, या मागणीसाठी शिवसेनेने सोमवारी भाईंदर व मीरा रोड रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन केले.मीरारोड येथील फेरीवाल्यांना सेनेच्या पदाधिका-यांनी गुलाबाचे पुष्प देऊन त्यांना रस्त्यावर ठाण मांडू नये, असे आवाहन केले. यावेळी आ. प्रताप सरनाईक यांनी यंदा आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत आहोत, पुढे फेरीवाले पुन्हा बसले तर मात्र गांधीगिरीऐवजी दांडीगिरीने धडा शिकवू, असा इशारा दिला. सेनेच्या आंदोलनानंतरही फेरीवाले बसतात की नाही याची खातरजमा करण्याचे काम करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या किमान दहा पदाधिका-यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनीही सेनेच्या या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, महिला उपजिल्हासंघटक स्नेहल सावंत, शहरप्रमुख धनेश पाटील, प्रशांत पालांडे, प्रकाश मांजरेकर, गटनेता हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका नीलम ढवण, शर्मिला बगाजी, अर्चना कदम, स्रेहा पांडे, नगरसेवक दिनेश नलावडे, एलायस बांड्या, उपशहरप्रमुख पपू भिसे, विनायक नलावडे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.जनवादी हॉकर्स सभा या फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष अॅड. किशोर सामंत यांनी मात्र सेनेचे आंदोलन प्रसिद्धीची स्टंटबाजी असल्याचा आरोप केला. देशभरात गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम सुरू असताना सेनेने मात्र गेल्या २७ वर्षांपासून फेरीवाला व्यवसाय करणा-यांचीच स्वच्छता चालविल्याचा टोला त्यांनी सेनेला लगावला. फेरीवाल्यांना केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणांतर्गत पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, त्यानंतरच त्यांना हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. सेनेच्या भार्इंदर रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या आंदोलनाला रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिका-यांनी परवानगी नसल्याच्या कारणास्तव विरोध केला. त्याकडे दुर्लक्ष करीत सेनेने मात्र आपले आंदोलन सुरूच ठेवले.
भार्इंदरमध्ये शिवसेनेचे गांधीगिरीतून फेरीवाल्यांविरोधात आंदोलन; फेरीवाला संघटनेकडून स्टंटबाजीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 5:04 PM