सांगली : निधी उपलब्ध असतानाही नागठाणे येथील बालगंधर्वांचे स्मारक रखडल्याची बाब क्लेशदायी असून, आता शासनदरबारी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी चळवळ उभी करून मी पुढाकार घेण्यास तयार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी येथे केले.अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे येथील भावे नाट्यमंदिरात गोखले यांना नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या हस्ते ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गौरव पदक, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गोखले म्हणाले की, परंपरा जपत मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या विष्णुदास भावे यांच्याइतक्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची नवीन कलाकारांना ओळख करून देण्यासाठी सांगलीकरांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाटकाचे दिग्दर्शन, अभिनय आणि नियोजन या क्षेत्रातील भावे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व मराठी रंगभूमीला लाभले, हे नशीबच मानावे लागेल. ते केवळ मराठी रंगभूमीचेच नव्हे, तर भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार आहेत.बालगंधर्वांच्या स्मारकाला साडेतीन कोटी निधी उपलब्ध असतानाही, त्याचे काम रखडले आहे. शासन त्याच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करीत नसल्याने आता आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सांगलीतील नाट्यदिग्दर्शिका चेतना वैद्य यांचा गोखले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)पाच नोव्हेंबरला सांगलीतनाट्यक्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरवपदक मिळणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनी सांगलीला भेट देणार आहे. या दिवशी पूर्ण दिवस येथील कलाकारांना अभिनयाचे धडे देण्यास तयार असल्याचेही गोखले यांनी सांगितले.
बालगंधर्व स्मारकासाठी चळवळ उभारणार
By admin | Published: November 06, 2015 1:28 AM