पिंपरी सांडस : पिंपरी सांडस येथील गट क्र. ४९३ या वन विभागाच्या जागेमध्ये घनकचरा प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रकल्पाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती अधिकार सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी मिळविली आहे. त्यातून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुणे महापालिका हद्दीतील कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर बनली असल्याने घनकचरा पिंपरी सांडस येथील हद्दीतील वन जमिनीमध्ये टाकण्याचे शासनाकडून नियोजन करण्यात आले होते. मात्र, परिसरातील इतर गावांनी कचरा डेपोविरोधी संघर्ष समिती स्थापन करून ग्रामसभेत ठराव घेऊन विरोध दर्शविला होता. पुणे-नगर महामार्गावर रास्ता रोको करून प्रकल्पाला प्रचंड विरोध दर्शवून आंदोलन केले होते. त्यानंतर मात्र हा प्रकल्प थंड बस्त्यात असल्याचे शासनाकडून भासवले. विविध विभागांकडून परवानग्या घेण्यात शासन यशस्वी झाले आहे. केंद्र शासनासह प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर, हरित लवाद, पुरातत्त्व विभाग व अन्य विभागांकडून परवानग्या मिळाल्यामुळे कचरा प्रकल्प होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)अंदाजे झाडांची संख्या वन विभागाच्या ज्या जागेवर हा प्रकल्प होत आहे, त्या जागेवरील झाडांची संख्या संबंधित वन विभागाने प्रत्यक्षात न करता एक हेक्टर जागेतील झाडांची संख्या मोजून त्यानुसार १९ हेक्टर ९० आर या क्षेत्रातील झाडांचा अंदाज घेऊन एकूण ४,६३७ झाडे असल्याचा अहवाल सादर केला आहे.
कचरा प्रकल्पाच्या हालचाली
By admin | Published: January 21, 2017 1:02 AM