औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा काढल्यानंतर मराठवाड्यात आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी त्याचे ठिकठिकाणी पडसाद उमटले. नांदेडमध्ये आंदोलकांनी स्थानिक मराठा आमदारांचे पुतळे जाळले तर बीड, परभणीत बसेसवर दगडफेक झाली. लातूर, उस्मानाबादमध्येही आंदोलन करण्यात आले.मराठा आरक्षणासाठी परळीत (जि. बीड) बुधवारी मराठा क्रांती ठोक मोर्चा काढल्यानंतर सुरू असलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारीही कायम होते. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारपर्यंत परळी, माजलगाव, अंबाजोगाई, केज येथे राज्य परिवहन महामंडळाच्या पाच बसेसवर दगडफेक करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक अशोक पन्हाळकर यांनी सांगितले. गेवराईत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. धारुरमध्ये शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.केजमध्ये मोर्चा काढून रास्ता राको आंदोलन झाले. माजलगाव येथे परभणी फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उमरी येथेही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.परभणीत वसमत रोड आणि जिंतूर रोडवर दगडफेक करीत आंदोलकांनी पाच बस फोडल्या. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातुरातील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मुंडण करीत सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली.कळंब येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देण्यात आला़ तुळजापूर येथे बंद पाळून आंदोलन करण्यात आले़ जालना जिल्ह्यात जाफ्राबाद, परतूर व मंठा येथे तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.मराठा आरक्षणाचा मुद्दा नागपूर अधिवेशनात उपस्थित न केल्याच्या निषेधार्थ नांदेड येथे मराठा समाजाच्या काही तरुणांनी स्थानिक सर्वपक्षीय मराठा आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले़>मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ शुक्रवारी बीड जिल्ह्यात ठिय्या, धरणे आंदोलन सुरू आहे. माजलगाव येथे शुक्रवारी परभणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 5:26 AM