मुंबई : कोकणातील नाणार प्रकल्पाविरोधात सुरू असलेले शिवसेनेचे आंदोलन म्हणजे भाजपाशी केलेल्या एका डीलचा भाग असून, हे भाजपा-शिवसेनेचे मॅच फिक्सिंग असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.ते म्हणाले, मुळात केंद्र सरकारला नाणारचा प्रकल्प गुजरातला पळवायचा आहे.परंतु, हा प्रकल्प आपल्या काळात गुजरातमध्ये गेल्याचे पाप मस्तकी यायला नको म्हणून भाजपाने शिवसेनेला हाताशी धरले आहे. दोन्ही पक्षांच्या संगनमताने ठरलेल्या रणनीतीनुसार शिवसेनेने प्रकल्पाला विरोध करायचा आणि भाजपाने सुरुवातीला या प्रकल्पाची रदबदली करून काही काळाने जनमताचा आदर करीत असल्याची सबब सांगायची आणि हा प्रकल्प रद्द करायचा, असे हे कारस्थान असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.या प्रकरणामध्ये भाजपा-शिवसेना दोघेही मिळून जनतेला मूर्ख बनवू पाहत आहेत. एकीकडे शिवसेनेचे उद्योगमंत्री विधानसभेत हा प्रकल्प रद्द केल्याचे सांगतात, तर दुसरीकडे भाजपाचे केंद्र सरकार या प्रकल्पाला विविध प्रकारच्या मान्यता देते, हा दुटप्पीपणा असल्याचेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.राज्य सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर फक्त ‘सेल्फ प्रमोशन’साठीच केली होती, अशी टीकाही विखे पाटील यांनी केली. कर्जमाफीनंतर मागील तीन महिन्यांत झालेल्या ६९६ शेतकरी आत्महत्या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील एका शेतकºयाने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केल्याच्या घटनेबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
नाणारचे आंदोलन म्हणजे भाजपा-सेनेचे ‘मॅच फिक्सिंग’! विखे पाटील यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:41 AM