पुणे : भारतातील दहा शासकीय व दहा खासगी विद्यापीठांना सर्वप्रकारे साहाय्य करून जगातील नामांकित विद्यापीठांच्या स्तरापर्यंत घेऊन जाण्याच्या केंद्र शासनाच्या हालचालींना आता वेग आला आहे. केंद्राच्या या योजनेत राज्यातील विद्यापीठांचाही समावेश व्हावा, यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी याबाबत नुकतीच चर्चा केली. तसेच रँकिंग उंचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत भारतातील विद्यापीठे खूप मागे आहेत. पहिल्या दोनशे विद्यापीठाच्या यादीत भारतातील एकही विद्यापीठ नाही. त्यामुळे देशातील विद्यापीठांचे रँकिंग वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने काही सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यात प्रामुख्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशातील विद्यापीठांचे व महाविद्यालयांचे त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रँकिंग देण्यात आले. त्याचप्रमाणे देशातील दहा शासकीय व दहा खासगी विद्यापीठांना सर्व प्रकारची मदत करून या विद्यापीठांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. या विद्यापीठांच्या यादीत राज्यातील विद्यापीठांचा समावेश व्हावा, या उद्देशाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कुलगुरूंशी चर्चा केली. सोलापूर व नांदेड विद्यापीठ वगळता, इतर विद्यापीठांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.राज्यातील विद्यापीठांचे रँकिंग उंचविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्य शासनातर्फे येत्या दोन महिन्यांत राज्यातील पाच विद्यापीठांची नावे केंद्र शासनाला कळविली जाणार आहेत. त्यातून केंद्र शासनातर्फे विद्यापीठांचा स्वतंत्रपणे विकास करण्यासाठी राज्यातील एक किंवा दोन विद्यापीठांची निवड केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राज्यातील विद्यापीठांच्या रँकिंगवाढीसाठी हालचाली
By admin | Published: October 03, 2016 3:59 AM